बेळगाव लाईव्ह :बैलहोंगल पोलिसांनी महाराष्ट्रातील दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्याद्वारे बैलहोंगलसह जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या दहा घरफोड्यांचा छडा लावताना 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे दीपक सुरेश पवार (वय 22) आणि राहुल गंगाधर जाधव (वय 21, दोघेही रा. करत मंग्रूल झोपडपट्टी, पो. कुंभार पिंपळगाव ता. गनसांगी जि. जालना महाराष्ट्र) अशी आहेत.
बैलहोंगल शहरासह नेसरगी येथे नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या घटनांना जबाबदार चोरट्यांना पकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर एस. गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणू गोपाल पोलीस उपअधीक्षक आर. बी. बसर्गी आणि रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी व्ही सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
या पोलीस पथकाने शीघ्रगतीने कसून तपास करून महाराष्ट्र राज्यातील उपरोक्त दोघा जणांना अटक केली आहे. पोलीस चौकशीत दीपक पवार व राहुल जाधव या दोघांनीही बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी, हुक्केरी आणि संकेश्वर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील 10 घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
त्यानुसार या दोघांकडून पोलिसांनी चोरीला गेलेले 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सदर कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैलहोंगल पोलिसांची प्रशंसा केली आहे.
अटक केलेल्या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस अधिक तपास करत आहेत.