बेळगाव लाईव्ह : कुद्रेमानी (ता. जि.) बेळगाव येथील श्री बलभीम साहित्य संघातर्फे आयोजित 18 वे मराठी साहित्य संमेलन आज रविवारी सायंकाळी कै. परशराम गुरव साहित्य नगरी येथे मराठीच्या जागरात कवी, चित्रपट गीतकार व साहित्यिक बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) यांच्या अध्यक्षतेखाली उस्फुर्त प्रतिसादात पार पडले.
कुद्रेमनी येथे आज सकाळी संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पूजाविधी, पालखी पूजन व ग्रंथ पूजन झाल्यानंतर संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या या सवाद्य ग्रंथदिंडीत मान्यवर साहित्यिकांसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी वेशीतील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याचे पूजनही करण्यात आले. ग्रंथदिंडीपूर्वी मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार व दत्ता पाटील (शिनोळी) यांच्या हस्ते पॉलीहायड्रॉन व्यासपीठ तसेच कै. सावित्री व कै. यल्लाप्पा गुरव सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि कै. परशराम मि. गुरव साहित्य नगरीचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दालनाचे उद्घाटन कै. परशराम मि. गुरव स्मारकाचे पूजन झाले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी स्वागत गीतानंतर बलभीम साहित्य संघाचे बाळाराम धामणेकर यांच्या प्रास्ताविक केले. तसेच स्वागताध्यक्ष डॉ. मधुरा गुरव (मोटाराचे) यांनी व्यासपीठावरील मान्यवर व रसिक श्रोत्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्य उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर प्रतिमा, जिजाऊ प्रतिमा, सावित्रीबाई फुले प्रतिमा, महात्मा ज्योतिराव फुले प्रतिमा, शिवप्रतिमा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, राजश्री शाहू महाराज प्रतिमा आणि स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्या माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी सन्माननीय अतिथी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर नागेश सातेरी, मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी मिनू पाटील, उपाध्यक्ष आर. आय. पाटील, उद्योजक सिद्धार्थ सुरेश हुंदरे, म. ए. समिती युवा नेते आर. एम. चौगुले, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. महेश बिर्जे, ॲड. श्याम पाटील, चंदगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एन. एम. गुरव, सह्याद्री सोसायटी बेळगावचे अध्यक्ष ए. व्ही. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या मातृभाषेच प्राधान्य दिले पाहिजे. आज आम्ही सीमावासीय मराठी बांधव महाराष्ट्रात जाण्यासाठी झगडतोय तर कर्नाटक आम्हाला सोडत नाही आणि महाराष्ट्र घेत नाही अशी परिस्थिती आहे असे सांगून यासाठी माझी संमेलनाध्यक्षांना विनंती आहे की यापुढे त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मराठी अस्मितेची एक तरी ओळ लिहावी. ज्या ज्या वेळी कवी संमेलन होतील त्यामध्ये महाराष्ट्राच्या सीमेवरील आम्हा मराठी भाषिकांची व्यथा मांडावी असे सरस्वती पाटील म्हणाल्या.
उद्घाटनानंतर सकाळच्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात खेड्यातून लिहिणाऱ्या सर्वच कवी लेखकांकडे शब्दांचा खच्चून भरलेला खजिना आहे. पण तो घेतला जात नाही. आम्हाला कोणी उलगडून पहात नाही. आम्हाला उलगडून पाहिलं तर आम्ही निश्चितपणे शहरातील कवींना मागे टाकू, एवढा खजिना आमच्याकडे असतो असे सांगून आपले समयोचित विचार व्यक्त केले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात कवयित्री डॉ. पल्लवी परुळेकर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. त्यामध्ये कवी इंद्रजीत घुले (मंगळवेढा), संतोष काळे (सांगली), विश्वास पाटील (राधानगरी) व अमृत पाटील (कुद्रेमनी) यांचा सहभाग होता. दुपारी स्नेहभोजनानंतर विशेष योगदान देणाऱ्यांचा संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या सत्रात सांगोल्याचे प्रबोधनकार संदीप मोहिते व अण्णा चव्हाण यांचा जुगलबंदी भारुडातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. मराठीचा जागर करत संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनास निमंत्रित मान्यवर मंडळी, साहित्यिक, कवी यांच्यासह बेळगाव तसेच कुद्रेमनी परिसरातील साहित्यप्रेमी आणि मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.