बेळगाव लाईव्ह:आयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठान निमित्त उद्या शनिवारी प्रत्येक शाळांनी आपापल्या परिसरात सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरी काढावी अशी विनंती आम्ही शहरातील सर्व शाळांना केली आहे, अशी माहिती भाजप व क्षत्रिय मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी दिली.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त आपण बेळगावात हाती घेतलेल्या विविध उपक्रमाबाबत आज बेळगाव लाईव्हला माहिती देताना जाधव बोलत होते.
ते म्हणाले की, येत्या सोमवारी 22 रोजी अयोध्येतील श्रीराम जन्म भूमीतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांनी उद्या शनिवारी आपापल्या परिसरात श्रीराम जय जय रामचा जयघोष करत विद्यार्थी -विद्यार्थिनींची प्रभात फेरी काढून जनजागृती करावी. त्यानंतर सोमवारी सकाळी शाळा भरल्यानंतर असेंबलीच्या वेळी मुलांना अयोध्येतील राम जन्मभूमी येथे होणाऱ्या श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठानेबद्दल माहिती देण्यात यावी, असे आवाहन आम्ही केले आहे.
अयोध्येतील सोहळ्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण असले तरी मुलांना ते सलग पाहणे कंटाळवाणी वाटू शकते किंवा त्यांच्या डोक्यात कांही शिरणार नाही, तेच जर शिक्षकांनी मुलांना समजावून सांगितले तर ते मुलांच्या डोक्यात लगेच जाईल. यासाठी सदर उपक्रम राबविण्याची विनंती आम्ही शाळांना केली आहे.
यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत 150 शाळांशी संपर्क साधला आहे. या खेरीज विविध ठिकाणी एलईडी टीव्हीवर आयोध्यातील सोहळ्याचे प्रक्षेपण 22 रोजी सायंकाळी पाहण्याची सोय केली जाणार आहे. याबरोबरच बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मैदानासह सरदार हायस्कूल मैदान व व्हॅक्सिन डेपो मैदानावर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत शिक्षण खात्याकडून अद्याप तरी कोणती आडकाठी करण्यात आलेली नाही. तसेच आम्ही देखील प्रभात फेरी आणि असेंबलीच्या वेळी मुलांना मार्गदर्शन करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सर्व शाळांना दिले आहे, असे भाजप नेते किरण जाधव यांनी शेवटी स्पष्ट केले.