बेळगाव लाईव्ह :हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगावतर्फे आयोजित मुला-मुलींच्या भव्य आंतर शालेय आणि आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेला आज सोमवारी सकाळी टिळकवाडीतील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला.
लेले मैदानावर स्पर्धेच्या आज सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेत्या नियती फाउंडेशनच्या संस्थापिका डाॅ. सोनाली सरनोबत, बुडाचे माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, नगरसेवक आनंद चव्हाण, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि निळकंठ मास्तमर्डी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्याबरोबरच हॉकीचा फटका मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा उद्घाटनाच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघामधील खेळाडूंची परिचय करून देण्यात आला.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थित मुला-मुलींना जीवनातील शिक्षणाचे व खेळाचे महत्व विशद केले. आरोग्य आणि स्वच्छतेची कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी खेळाडूंनी कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे याची माहिती दिली.
त्याचप्रमाणे येत्या काळात आपल्या नियती फाउंडेशन या बिगर सरकारी संघटनेतर्फे आपण राज्य व राष्ट्रीय पातळीवर बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी सहाय्य व पाठिंबा देणार असल्याचे डॉ. सरनोबत यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी हॉकी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, उपाध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, राजेंद्र पाटील आदींसह बहुसंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गोगटे कॉलेज आणि पीपल ट्री कॉलेज यांच्यात खेळविला गेला. सदर स्पर्धेत 12 महाविद्यालयीन आणि 9 शालेय अशा एकूण 21 संघांनी भाग घेतला आहे. महाविद्यालयीन आणि शालेय संघांचे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहेत. महाविद्यालयीन विभाग ‘अ’ गट : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, पीपल ट्री कॉलेज. ‘ब’ गट : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, बी. के. कॉलेज.
शालेय विभाग ‘अ’ गट : एम. आर. भंडारी हायस्कूल, ज्ञानमंदिर हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, वाय. एम. शानभाग हायस्कूल. ‘ब’ गट : एम. आर. भंडारी हायस्कूल, जी. जी. चिटणीस हायस्कूल, ज्ञान मंदिर हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल काकती, ताराराणी हायस्कूल खानापूर. सदर स्पर्धेअंतर्गत 12 जानेवारीपर्यंत सुमारे 46 हून अधिक हॉकी सामने खेळविले जाणार आहेत.