आझादनगर, बेळगाव येथील केपीटीसीएल हॉल नजीकच्या 33/11 केव्ही किल्ला विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढवून ते 110/11 केव्ही क्षमतेचे केले जाणार असून या कामाचा भूमिपूजन समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ उपस्थित होते.
यावेळी विधिवत पूजा करण्याबरोबरच पालकमंत्री यांच्या हस्ते कुदळ मारून अधिक क्षमतेच्या नव्या विद्युत उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या दहा वर्षात बेळगाव शहराचा होणारा विकास लक्षात घेऊन आझादनगर येथील या विद्युत उपकेंद्राची क्षमता 33/11 केव्ही वरून 110/11 केव्ही इतकी वाढवण्यात येणार आहे आणि या नव्या सुधारणेसाठी 33.91 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आमदार सेठ यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे केपीटीसीएलच्या कार्यकारी अभियंत्यांनी यांनी येत्या काळात जिल्हा आणि तालुका पातळीवर सध्या असलेल्या 33/11 केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढवून त्यांचे 110 /11 केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रात रूपांतर केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे 110 केव्ही कणबर्गी नेहरूनगर विद्युत मार्गाने 2.712 केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. आझादनगर येथील आजच्या भूमिपूजन समारंभास निमंत्रितांसह केपीटीसीएलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.