बेळगाव लाईव्ह :नववर्षाच्या या जानेवारी महिन्या अखेर आज बुधवारी आंब्याचा राजा हापुस बेळगावात दाखल झाला असून त्याची आवक बेळगावच्या फ्रुट मार्केटमध्ये सुरू झाली आहे.
यंदा सर्वप्रथम बेळगाव फ्रुट मार्केट मधील एम. बी. देसाई अँड सन्स नारायण शंकर कंपनीमध्ये आज कोकणातील हापूस आंबा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे देसाई यांच्या दुकानातच पहिली लिलाव प्रक्रियाही पार पडली. त्यामध्ये दोन प्रकारच्या हापूस आंब्यांचा लिलाव झाला. संदीप देसाई यांनी लीलालाची सुरुवात केली.
अर्धा डझनाला 1000 रुपयांपासून बोली लावण्यात आली. ती वाढत जाऊन अखेर 3500 आणि 3600 रुपयांनी हापूस आंब्याची होलसेल खरेदी झाली. या खरेदीचे उपस्थित व्यापाऱ्यांकडून टाळ्या गजरात स्वागत करण्यात आले. एम. बी. देसाई अँड सन्सचे संदीप देसाई यांनी सर्वप्रथम हापुस आंब्याची पूजा केली त्यानंतर ही लिलाव प्रक्रिया पार पाडली.
लिलावात बाजी मारणाऱ्या व्यापाऱ्याने यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना कोकणातील हापूस आंबा यंदा आज पहिल्यांदा बेळगावात आला आहे. हा आंबा अतिशय दर्जेदार शुद्ध हापूस आंबा आहे. बेळगावामध्ये दरवर्षी 15 फेब्रुवारीपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होते.
त्याचप्रमाणे मी अर्ध्या डझन आंबा 3500 व 3600 रुपये इतक्या होलसेल दराने खरेदी केला आहे. त्यांची बाजारातील किंमत 7200 रुपये इतकी असणार आहे असे सांगून आवक वाढल्यानंतर म्हणजे येत्या 15 फेब्रुवारीनंतर हा दर कमी सर्वसामान्य होईल, अशी माहिती त्यांनी दिली.