बेळगाव लाईव्ह :वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यात कोरोना बाबत खबरदारी घेण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुस, यकृताशी संबंधित विकार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीच्या गेल्या 4 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर ज्या शिफारसी करण्यात आल्या आहेत, त्यानुसार नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
श्वसनाशी संबंधित विकार होऊ नयेत यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुस, यकृताशी संबंधित विकार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला यानी कोरोना काळात त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
सर्दी किंवा श्वसनाशी संबंधित कोणताही कोणतीही तक्रार असेल तर त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. तसेच संसर्गाची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रातूनच तातडीने उपचार घ्यावेत.
सर्दी किंवा श्वसनाचे विकार असतील आणि कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असेल तरीही संबंधितांना वैद्याच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत असे सांगण्यात आले आहे. विविध गंभीर विकारांनी त्रस्त असलेल्यांना जर कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या कोरोना बाधितांच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभागाला आवश्यक ते सहकार्य करावे.
बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी ही नियमानुसार केली जावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी बेळगाव जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आहे.