बेळगाव लाईव्ह :गोवावेस येथील पेट्रोल पंपाच्या जागेसाठी काल शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या चौघांपैकी एकाने तब्बल 5 लाख 41 हजार रुपयांची विक्रमी बोली लावून जागा भाडेकराराने घेतली आहे.
गोवावेस येथील पेट्रोल पंपाची जागा महापालिकेच्या मालकीची असून ती जागा भाडे कराराने देण्यासाठी काल शनिवारी ऑनलाईन लिलाव प्रक्रिया पार पडली. सदर पेट्रोल पंपाच्या जागेच्या लिलावात 2 लाख 27 हजार रुपये मूळ बोली होती.
लिलावात सहभागी झालेल्यांना त्यापुढे बोली लावणे आवश्यक होते. लिलाव प्रक्रियेत चौघेजण सहभागी झाले होते. लिलावात मूळ बोलीच्या दुपटीहून अधिक बोली प्रत्यक्षात लावण्यात आली आहे. ही सर्वोच्च बोली कोणी लावली? हे महापालिकेकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याबाबतची माहिती जाहीर केली जाणार आहे. तथापि ज्या व्यक्तीने ही बोली लावली आहे. त्याने संपूर्ण अनामत रक्कम भरून जागेचा कब्जा घेण्याबरोबरच तेथे पेट्रोल पंप सुरू केला तर महापालिकेला दरमहा 5 लाख 41 हजार रुपये भाडे मिळणार हे नक्की झाले आहे.
कालच्या लिलाव प्रक्रियेचा कालावधी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होता. मात्र सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सध्या त्या जागेचा कब्जा महापालिकेकडे आहे. अनामत रक्कम चार महिन्याचे आगाऊ भाडे भरल्यानंतर महापालिकेकडून जागेचा कब्जा नव्या भाडेकरूला दिला जाणार आहे.