बेळगाव लाईव्ह :दलालांकडून बाहेरून गाजर मागवून स्थानिक गाजर उत्पादक शेतकऱ्यांचा भाव पाडून त्यांच्यावर अन्याय करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तसेच गाजर खरेदीमध्ये प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जय किसान होलसेल भाजी मार्केट येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव येथील अनगोळ, मच्छे, झाडशहापूर येळ्ळूर सांबरा, नेसरगी वगैरे भागात मोठ्या प्रमाणात हजारो एकर गाजराचे पीक घेतले जाते. तसेच शेतकऱ्यांकडून त्याची शहरातील एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान भाजी मार्केट येथे विक्री केली जाते.
या पद्धतीने मोठ्या प्रमाणात स्थानिक गाजर उपलब्ध असताना यावेळी जय किसान होलसेल भाजी मार्केट येथील दलालांकडून महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यातून कमी दराने गाजराची आवक मागवली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात प्रति दहा किलो 450 ते 500 रुपये दर मिळणाऱ्या स्थानिक गाजराचा दर या आठवड्यात एकदम 150 -200 रुपयांपर्यंत घसरला आहे. परगावचे गाजर खरेदी करून या पद्धतीने स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे समजताच कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने जय किसान भाजी मार्केटच्या कार्यालयासमोर आज तीव्र आंदोलन छेडले.
शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नायक व राजू मरवे यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनात बहुसंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता. या शेतकऱ्यांनी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर धरणे धरून तसेच अंगावर गाजर ओतून घेऊन रस्त्यावर लोटांगण घालण्याद्वारे आपला संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या दलालांचा धिक्कार असो, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आदी घोषणा देण्यात येत होत्या.
सदर आंदोलनाची माहिती मिळताच जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची तक्रार ऐकून घेतली. यावेळी शेतकरी नेते नायक व मरवे यांनी गाजर खरेदीच्या बाबतीत दलालांकडून कशाप्रकारे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे याची माहिती दिली.
तसेच सदर प्रकार त्वरित थांबून गाजर खरेदीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अन्यथा येत्या काळात हजारो शेतकऱ्यांना घेऊन यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. त्यावर येत्या गुरुवारी भाजी मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य व दलालांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नायक म्हणाले की, आता शेतकऱ्यांना दगा देण्याची नवी शक्कल होलसेल भाजी मार्केटमधील दलालांनी शोधून काढली आहे. बेळगावाच गाजर प्रसिद्ध आहे आणि अतिशय चांगले आहे. सध्या गाजराचे पीक उत्तम आले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असताना जय किसान भाजी मार्केट मधील दलालांनी नागपूर, गुजरात, बेंगलोर येथून गाजर मागवून स्थानिक गाजराचा भाव पाडला आहे. मागील आठवड्यात गाजराचा प्रती 10 किलो दर 450 रुपये होता तो दर दलालांनी या आठवड्यात 150 रुपये इतका करून ठेवला आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना कमी दर देऊन आपण मात्र बाजारभावाने गाजराची विक्री करण्याद्वारे लूटमार करण्याचा प्रकार दलालांनी चालवला आहे. या पद्धतीने दलालांकडूनही आता दगा देणारी व्यापारी वृत्ती दाखवली जात आहे. मात्र हे खपवून घेतले जाणार नाही. गाजर वगैरे कृषी उत्पादनांची खरेदी करताना कोणत्याही परिस्थितीत प्रथम प्राधान्य स्थानिक शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे.
त्यांना योग्य भाव दिला जावा. दलालाने लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या विश्वासावर शेतकरी पीक घेत असतो. आमचे पीक विकून तुम्ही फायदा कमवा पण आम्हाला दगा देऊ नका, अन्यथा भाजी मार्केट बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शेतकरी आहेत म्हणून हे भाजी मार्केट आहे, तुमच्या खिशात पैसे आहेत हे दलाल व व्यापाऱ्याने लक्षात ठेवावे. दगा देण्याची फसवण्याची देखील एक मर्यादा असते असे सांगून यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही.
भाजी मार्केट सुरू रहावयाचे असेल तर सदर गैरप्रकार तात्काळ थांबवावा आणि शेतकऱ्यांचा माल योग्य दरात घ्यावा, अन्यथा त्याच्या दुष्परिणामास व्यापारी व दलाल जबाबदार राहतील, असा इशारा प्रकाश नायक यांनी दिला. शेतकऱ्यांच्या आजच्या या आंदोलनात भरमा नंदीहळ्ळी, मनोहर केरवाडकर आदी बेळगाव परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.