बेळगाव लाईव्ह : निवडणुका जवळ आल्या कि एक पक्ष अति वेगाने तर दुसरा पक्ष कमी वेगाने पुढे जातो. या काळात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेणे, पक्षबदल करणे हि गोष्ट सामान्य असल्याचे मत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये आज आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया दिली. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा घरवापसी केली. या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त संदर्भ सांगितला. ते पुढे म्हणाले, यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष आयोजन करण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये संविधानाचे प्रास्ताविक वाचण्यात आले.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जिल्ह्याच्या विकासकामांसंदर्भात पाऊले उचलण्यात येणार असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नव्याने निविदा मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील हलगा-मच्छे बायपास रस्ता बांधकामाचा कायदेशीर प्रश्न निकाली निघाला असून तांत्रिक कारणास्तव काम सोडून दिलेल्या कंत्राटदाराला काम पुढे चालू ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळविण्यात आले आहे.
तसेच याप्रकरणी दिल्ली स्तरावर निर्णय घेऊन लवकरच कामकाजाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जारकीहोळींनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत जगदीश शेट्टर यांना बेळगावमधून उमेदवारी मिळेल का याबाबत पक्षालाच प्रश्न विचारण्याचे त्यांनी सांगितले. तसेच लक्ष्मण सवदी यांना मंत्री बनविणे हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सोपविल्याचेही ते म्हणाले. बेळगावच्या महानगरपालिकेवर महापौर काँग्रेस पक्षाचा असो किंवा भाजपचा त्यांना आपला पाठिंबा असेल, तसेच येत्या आठवड्यात पालिका मंडळाची नियुक्तीही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजू सेठ, आमदार महेंद्र तीम्मणावर, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी उपस्थित होते.