बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पर्वात होणार असून आरक्षणा नुसार महापौर पदासाठी आमच्याकडे दोन उमेदवार तयार आहेत, अशी माहिती महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नगरसेवक हनुमंत कोंगाली यांनी आज गुरुवारी दिली.
शहरात बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक कोंगाली म्हणाले की येत्या 6 फेब्रुवारी रोजी किंवा त्यानंतर आपल्या बेळगाव महानगर पालिकेच्या नूतन महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आहे.
या वेळच्या महापौर पदासाठी ‘अनुसूचित जाती महिला’ असे आरक्षण असून उपमहापौर पद ‘सर्वसामान्य पुरुष’ असे आरक्षित आहे. सदर निवडणूक प्रक्रियेची तयारी केली जात आहे. या निवडणुकीमध्ये आमचे भाजपचे 32 अधिक 2 असे बहुमत असणार आहे.
सरकारकडून हिरवा कंदील मिळताच महापौर -उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. महापौर पदाच्या अनुसूचित जाती महिला आरक्षणानुसार बेळगाव उत्तरमध्ये नगरसेविका लक्ष्मी राठोड आणि नगरसेविका सविता कांबळे असे दोन उमेदवार आहेत असे सांगून बेळगावातील आमदार माजी आमदारांच्या कोअर कमिटीमध्ये निवडणुकीची उमेदवारी कोणाला द्यायची? याचा अंतीम निर्णय होणार आहे असे नगरसेवक हनुमंत कोंगाली यांनी सांगितले.
विद्यमान महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास आता केवळ 14 -15 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. महापौर -उपमहापौरांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या दोन आठवडे आधीच पुढील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाते. तथापि प्रादेशिक आयुक्तांकडून ही निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेच्या कौन्सिल विभागासोबतही अद्याप कोणताच व्यवहार झालेला नाही. महापौर उपमहापौर निवडणूक जाहीर केली जावी यासाठी सत्ताधारी गटाचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतः महापौर शोभा सोमनाचे यांनी त्यासाठी प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
मात्र त्या पत्रालाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सध्या सत्ताधारी गटाची चिंता वाढली आहे. दरम्यान, प्रादेशिक आयुक्तांनी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले नाही तर सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरविकास मंत्र्यांच्या भेटीसाठी बेंगलोरला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसे झाल्यास महापौर निवडणुकीचा विषय राज्यभरात चर्चेला येऊ शकतो.