Wednesday, November 27, 2024

/

माय -लेकाचे प्रेम पाहून हॉस्पिटलने केला उपचाराचा खर्च माफ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :वडिलांविना पोरक्या हॉस्पिटलमध्ये दाखल आपल्या एकुलत्या एक कर्त्या मुलाच्या प्रकृतीबद्दल चिंतीत एका असहाय्य गरीब मातेला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलासा देण्याबरोबरच माय-लेकामधील प्रेम पाहून हॉस्पिटलने देखील उपचाराचा खर्च माफ केल्याची माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना नुकतीच शहापूर येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, मिरापूर गल्ली, शहापूर येथील व्यवसायाने वाहन मेकॅनिक असलेला लक्ष्मण मल्लाप्पा धामणकर (वय 44) हा सामाजिक कार्यकर्ता गेल्या सोमवारी रस्त्यावर फिट येऊन बेशुद्ध पडला होता. डोळे पांढरे केलेल्या लक्ष्मणला आसपासच्या लोकांनी तातडीने शहापूर छ. शिवाजी उद्यानाजवळील अपूर्वा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

याबाबतची माहिती मिळताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीला धावून जात लक्ष्मण याच्या घरी कळविले. त्याचे घर म्हणजे फक्त एक खोली असून त्यामध्ये तो व त्याची वयस्कर आई सुभद्रा असे दोघेच राहतात.Fb circle

सुभद्रा मल्लाप्पा धामणेकर (वय 63) या उदरनिर्वाहसाठी मोलकरणीचे काम करतात. सामाजिक कार्यकर्ते जेंव्हा हॉस्पिटलमध्ये पोचले त्यावेळी सुभद्रा असहाय्यपणे आयसीयू बाहेर जिन्याच्या पायऱ्यावर बसल्या होत्या. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्मण यांनी रात्रीचे जेवण व सकाळचा नाश्ता केला नसून तो उपाशी असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे सांत्वन करून आम्ही तुमच्या मुलासाठी औषध खरेदी करून आणली आहेत. काळजी करू नका आम्ही येथे आहोत. तुमच्या मुलाची काळजी आम्ही घेऊ असे सांगितले. तसेच चिंतीत सुभद्रा यांना त्यांच्याच गल्लीतील एका महिलेसोबत घरी धाडले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यानंतर डॉक्टरांची भेट घेतली असता त्यांनी लक्ष्मण याला लवकरच डिस्चार्ज देणार असल्याचे त्याचप्रमाणे सुभद्रा यांचे आपल्या मुलाविषयीचे प्रेम पाहून आपण आयसीयू उपचारासह एकंदर सर्व खर्च माफ करत असल्याचे सांगितले.

या पद्धतीने तातडीने आपले कर्तव्य पार पाडण्याबरोबरच गरीब धामणेकर कुटुंबीयांच्या बाबतीत माणुसकी दाखवल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे सुभद्रा धामणेकर यांच्या हस्ते अपूर्वा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिवानंद हळीगौडर, डॉ. चंद्रशेखर, डॉ. आनंद तोटगी व डॉ. ओमकार मिराशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर जॉन डिक्रुझ, आर. पोटे, विनायक बिर्जे, नंदन पाटील, चंद्रकांत कुरणकर, भारत नागरोळी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.