बेळगाव लाईव्ह :कर्नाटकातील भाविक यापुढे सरकारच्या आर्थिक मदतीवर दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. कारण धर्मादाय खात्याची कर्नाटक भारत गौरव काशी गया दर्शन योजना यशस्वी झाल्यामुळे सरकारने 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक भारत गौरव दक्षिण यात्रेला देखील सहाय्य धन देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या हिवाळा असल्यामुळे कर्नाटक भारत गौरव काशी, गया दर्शन यात्रा शक्य नाही. त्यासाठी पुढील दोन महिने काशी, गया यात्रा पॅकेज रद्द करण्यात आले आहे. तसेच या यात्रेसाठी सज्ज ठेवण्यात आलेली विशेष रेल्वे आता कर्नाटक भारत गौरव दक्षिण यात्रेसाठी वापरली जाणार आहे. सदर यात्रे अंतर्गत कर्नाटकातील भाविकांना धर्मादाय खात्याच्या सहाय्य धनावर रामेश्वर मधील श्री रामेश्वर देवालय, कन्याकुमारी श्री भगवती मंदिर, मदुराईचे श्री मीनाक्षी देवालय, तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आदी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
काशी यात्रेप्रमाणेच या यात्रेला देखील 5 हजार रुपये अर्थसाह्य दिले जाणार आहे. सदर यात्रेचा एकूण खर्च 15000 रुपये असून सरकारचे 5000 तर उर्वरित 10000 रुपये यात्रेकरूला भरावे लागतील.
सदर यात्रेसाठी असलेल्या विशेष रेल्वेत एकाच वेळी 640 यात्रेकरूंचा प्रवास होणार आहे. यासाठीचे ऑनलाइन बुकिंग 5 जानेवारीपासून https://www.irctctourism.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
कर्नाटक भारत गौरव दक्षिण यात्रेची विशेष रेल्वे 18 जानेवारीला प्रस्थान करणार असून 23 जानेवारीला माघारी परत येणार आहे. बेळगावसह हुबळी, बिरूर, दावणगिरी, यशवंतपूर रेल्वे स्थानकावर ही विशेष रेल्वे थांबणार आहे.