बेळगाव लाईव्ह :सफाई कामगारांनी पेटवलेल्या कचऱ्याच्या ढिगार्यातील ठिणगीमुळे गवत गंजींना आग लागून सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल सायंकाळी देसुर ग्रामपंचायतच्या मागील बाजूस घडली.
आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या गवत गंजी देसूर गावातील शेतकरी पुंडलिक पाटील व सातेरी गुरव यांच्या मालकीच्या होत्या. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, देसूर ग्रामपंचायतच्या मागील बाजूस गेल्या कांही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता.
तो कचरा साफ करण्यासाठी रोजंदारीवरील सफाई कामगारांना काल बुधवारी कामाला लावण्यात आले होते. कामगारांनी कचरा स्वच्छ करून सायंकाळी तो एका जागी ढीग करून पेटविला. मात्र वाऱ्यामुळे पेटत्या कचऱ्यातील ठिणगी जवळच असलेल्या गवत गंजीमध्ये पडून त्यांनी पेट घेतला.
सदर प्रकार निदर्शनास येताच तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन गंजींना लागलेली आग आटोक्यात आणली.
सदर दुर्घटनेमुळे पुंडलिक पाटील व सातेरी गुरव या शेतकऱ्यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गवत गंजींना आग लागण्याची ही घटना काल देसूर गावात चर्चेचा विषय झाली होती.