Sunday, January 12, 2025

/

पीक नुकसान भरपाईसाठी सरकारचे शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पावसाने अपेक्षित साथ दिली नाही. पेरणी केलेले पीक उगवून आल्यानंतर पाऊस न झाल्याने करपले.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे शिवाय चाऱ्याची कमतरताही निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप त्यावर कारवाई झाली नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वादामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून याबाबत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखविले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्याकडून सरकारच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. सरकारकडून पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत कृषी खात्याकडून अहवाल दिला असला तरी भरपाई देण्यात आलेली नाही.

शेतकऱ्याला वेळेत आर्थिक मदत मिळत नसेल तर भरपाईचा काय उपयोग होणार आहे? राज्य सरकारकडून 2 हजारांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र ती मदतही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 2 हजारांची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना किती समाधानकारक ठरणारी आहे. सध्याच्या परिस्थितीत दोन हजार रुपये हि अत्यल्प मदत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव दिला आहे.

मात्र केंद्र व राज्याकडून एकमेकांवर आरोप करत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. राज्यातील विरोधी पक्षाने भाजपकडून कोणतीच ठोस भूमिका घेतलेली जात नाही. तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांच्या मदतीला येण्यापासून दूर राहात आहे.

एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची फरफट होत आहे. त्वरित मदत न दिल्यास राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.