बेळगाव लाईव्ह :बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारत बांधकाम कंत्राटासाठी केएमव्ही प्रोजेक्ट्स ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे.
कंत्राट देण्याच्या लिलाव प्रक्रियेत 7 कंपन्यांचा सहभाग होता. त्यामध्ये केएमव्ही प्रोजेक्ट्सने सर्वात कमी म्हणजे 220.08 कोटी रुपयांची सर्वात कमी तर बीजी शिर्के कंपनीने सर्वाधिक 277.64 कोटी रुपयांची बोली लावली होती.
लिलावातील सातही कंपन्यांचे आर्थिक बोली मूल्य (कोटी रु.मध्ये) पुढील प्रमाणे होते. केएमव्ही प्रोजेक्ट -220.08, सीएस कन्स्ट्रक्शन कंपनी -221.46, हर्ष कन्स्ट्रक्शन्स -224.03, गिरिधारी लाल कन्स्ट्रक्शन्स -229.30, रिनाटस प्रोजेक्ट्स -239.91, केपीसी प्रोजेक्ट्स -243.38, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी -277.64. बेळगाव विमानतळाच्या नियोजित नव्या टर्मिनल इमारतीमध्ये 4 एरोब्रीज असतील.
हे ब्रिज गर्दीच्या वेळी 2400 प्रवाशांची (1200 येणारे व 1200 प्रस्थान करणारे) वर्दळ हाताळू शकतील इतक्या क्षमतेचे असतील. नवी टर्मिनल इमारत कार्यरत होताच अस्तित्वात असलेली इमारत प्रवाशांची आवक व्यवस्थापित करण्यासाठी पुनरुत्पादित केली जाईल.
ज्यामुळे बेळगाव विमानतळाला पुढील 2037 सालापर्यंत दरवर्षी 2.0 कोटी प्रवासी रहदारीच्या मागणीची पूर्तता करता येणार असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) सल्लागार लँड्रम अँड ब्राऊन यांचे मत आहे.
एएआयकडे व्यवस्थापन असलेले सध्याच्या प्रादेशिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम क्षेत्र 3600 चौ. मी. आहे, जेथे गर्दीच्या काळात 300 प्रवासी सामावू शकतात. बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारत बांधकाम प्रकल्पासाठी गेल्या नोव्हेंबर 2023 मध्ये एएआयने निविदा मागविल्या होत्या.
प्रकल्पासाठी सुमारे 265.04 कोटी रुपये खर्चासह तो पूर्ण करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. तांत्रिक लिलाव प्रक्रिया डिसेंबर 2023 मध्ये खुली झाली, जिच्यात एकूण 7 कंपन्यांनी सहभाग दर्शवला होता.