बेळगाव लाईव्ह :संविधानाची मूल्ये आणि आशयाबाबत लोकांत जागृती करण्यासाठी 26 जानेवारीपासून जिल्ह्यातील प्रत्येक गावात संविधान जागृती फेरी निघणार आहे, त्यासाठी ग्रामपंचायतींनी तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या.
संविधान जागृती फेरीसंदर्भात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री प्रियांक खरगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 18) सर्व जिल्हाधिकार्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यानंतर आयोजित जिल्हास्तरीय अधिकार्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते.
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते फेरीला चालना देण्यात येणार आहे. त्यानंतर ही जागृती फेरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फिरणार आहे. महिनाभर चालणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पंचायत, महसूल, पोलीस, कन्नड व सांस्कृतिक खाते, समाजकल्याण खात्याच्या अधिकार्यांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या.
यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा नागरविकास कक्षाचे नियोजन संचालक महांतेश कलादगी, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलसचिव राजश्री जैनापुरे,
माहिती विभागाचे उपसंचालक गुरनाथ कडबूर, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक बसवराज आदी उपस्थित होते.