बेळगाव लाईव्ह :अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषद बेळगाव जिल्हा शाखा आणि हनुमान चालीसा परिवारातर्फे उद्या शनिवार दि. 20 जानेवारी रोजी बेळगावमध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद बेळगाव जिल्हा शाखा आणि हनुमान चालीसा परिवारातर्फे आज शुक्रवारी सकाळी शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती देण्यात आली. याप्रसंगी विहींप जिल्हाध्यक्ष श्रीकांत कंद, सचिव आनंद कर्लिंगनावर, हनुमान चालीसा परिवाराचे गौरवाध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, अध्यक्ष जेटाभाई पटेल, बिपिन पटेल, संतोष वाधवा आदी उपस्थित होते.
उद्या शनिवारी शहरातील सरदार हायस्कूल मैदान आणि टिळकवाडीतील व्हॅक्सीन डेपो मैदान या ठिकाणी 11 वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण त्याचप्रमाणे महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी शहर परिसरातील हिंदू बांधवांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
यावेळी बोलताना एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषद बेळगाव शाखेतर्फे उद्या 20 जानेवारी रोजी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदान आणि शहरातील सरदार हायस्कूल मैदान या ठिकाणी हनुमान चालीसा पठाण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांसाठी किमान 10 हजार भक्त जमतील यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्नशील आहे. हनुमान चालीसा आणि महाआरतीच्या कार्यक्रमांमध्ये हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या दिवशी म्हणजे येत्या 22 जानेवारी रोजी प्रत्येक घरामध्ये आम्ही ज्या अक्षता पोहोचवल्या आहेत त्या अक्षता आणि श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा करावी.
गेल्या 5 डिसेंबर रोजी अयोध्येतून बेळगावात आलेल्या अक्षता शहरासह तालुक्यातील 4 लाख घरापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यांची येत्या 22 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 या कालावधीत पूजा करावी आणि खास दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्या पदाधिकाऱ्याने केले.