बेळगाव लाईव्ह :गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव शहर परिसरासह तालुक्यातील थंडीत वाढ झाली असून आज मंगळवारी बेळगावचा पारा 10.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यामुळे दिवसभर हवेत मोठा गारठा जाणवत आहे.
सद्यस्थितीत बेळगाव परिसरात दिवसभर ऊन रात्री थंडी आणि पहाटे थंडीसह धुके असे वातावरण निर्माण होत आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये थंडीला सुरुवात झाली असली तरी या महिन्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
बेळगावचे आजचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. या पद्धतीने पारा जवळपास 10 अंशापर्यंत घसरल्यामुळे अंगात हुडहुडी भरवणारे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या तीन दिवसापासून बेळगाव शहर परिसरातील थंडीमध्ये वाढ झाली असून गेल्या 20 ते 22 जानेवारी या तीन दिवसात अनुक्रमे 13, 13.5 व 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी बेळगावकरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.
शहरासह उपनगरांमध्ये थंडीची मजा लुटण्यासाठी सकाळी फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वयस्कर नागरिकांनी कानटोप्या घालून गरम कपड्यातच राहणे पसंत केल्याचे दिसत आहे. थंडीमुळे बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट, कानटोप्या, मफलर अशा उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.