बेळगाव लाईव्ह :घरफोडी चोरी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात वारंवार आवाहन करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने रामतीर्थनगर येथे जाऊन तेथील रहिवाशांना समज देण्याद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात नुकतीच जनजागृती केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी रामतीर्थनगर येथे प्रत्येकाने आपल्या इमारत अथवा घरांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तुम्ही लाखो रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहता, लाखोचे दागिने -कार गाड्या खरेदी करता आई-वडिलांपासून मुलांच्या हातात असलेल्या मोबाईल्सची किंमत लाखोच्या घरात जाते.
तुम्हाला इतका पैसा खर्च करता येतो तर मग 25 -30 हजार रुपये खर्च करून आपल्या इमारतीच्या घराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यास काय अडचण आहे? असा सवाल पोलीस अधिकाऱ्यांनी जमा झालेल्या नागरिकांना केला. वारंवार आवाहन करून देखील तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवत नाही.
उद्या काही अनुचित प्रकार घडला तर तुम्ही पुन्हा पोलिसांना दोष देणार, मोठमोठी घरे बांधून राहणारे तुम्ही कांही हजार रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यायला तयार नाही. खरंतर आम्हाला त्यासाठी तुम्हाला वारंवार विनंती करण्याची वेळ येता कामा नये. सध्या तुमच्या शेजारी असलेले ऑटोनगर हे तुम्हाला शाप आहे हे लक्षात ठेवा. ऑटोनगर येथील औद्योगिक वसाहतीत रात्रंदिवस काम सुरू असते.
त्या ठिकाणी परराज्यातील वाहनांची ये -जा सुरू असते. त्या वाहनांमधून यूपी, राजस्थान बिहार वगैरे परराज्यातील कामगार येत असतात. त्या सर्वच कामगारांची मनोवृत्ती चांगली असेल असे सांगता येत नाही. त्यापैकी कोणी माघारी जाता जाता तुमच्या भागात चोरी करून जाऊ शकतो.
अशा घटनांवर नियंत्रण आणावयाचे असेल, चोरट्यांना पकडायचे असेल तर तुम्ही बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत होऊ शकते हे लक्षात घ्या असे पोलीस अधिकाऱ्यांनी रामतीर्थनगर येथील रहिवाशांना सांगितले. रामतीर्थनगर ही वसाहत काहीशी शहराबाहेरील असल्यामुळे तेथील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंगले, घरं, निवासी संकुल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून सातत्याने केली जात आहे.
मात्र स्थानिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रामतीर्थनगर येथे जाऊन वरील प्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्या संदर्भात जनजागृती केली.