बेळगाव लाईव्ह :बेळगावचे रहदारी पोलिस शहरातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहन चालकांची अडवणूक करून दंड वसूल करण्यातच धन्यता मानतात हे सर्वश्रुत झाले आहे.
याचीच प्रचिती आज दुपारी आली जेंव्हा ट्रक, टेम्पो वगैरे नव्हे तर चक्क भल्या मोठ्या कंटेनरने भर बाजारपेठेत प्रवेश केल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन धन्यवाद चालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
शहराच्या अंतर्गत भागात विशेष करून बाजारपेठेत अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी आहे. मात्र असे असतानाही रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बऱ्याचदा ट्रक, टेम्पो वगैरे सारख्या वाहनांच्या बाजारपेठेतील वावरामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असते.
या पद्धतीने ट्रक वगैरे वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा अनुभव असलेल्या बाजारपेठेतील लोकांना आज दुपारी वेगळाच अनुभव आला, जेंव्हा एका भल्या मोठ्या कंटेनरने शहराच्या मध्यवर्तीय भागात प्रवेश केला. आजच्या शनिवारच्या बाजाराच्या दिवशी या पद्धतीने बाजारपेठेत कंटेनर घुसल्यामुळे भेंडी बाजार व पांगुळ गल्ली कॉर्नरवर बराच काळ वाहतुकीची कोंडी होऊन चक्काजाम झाला होता.
सदर वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच भरबाजारपेठेत अशाप्रकारे कंटेनरच्या वाहतुकीला परवानगीच कशी दिली जाते? असा संतप्त सवाल केला जात होता. खरे तर आजचा शनिवारचा बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजारपेठेतील रहदारी सुरळीत राहील.
किमान या दिवशी तरी कोणतेही अवजड वाहन बाजारपेठेत प्रवेश करणार नाही याची दक्षता रहदारी पोलिसांनी घ्यावयास हवी होती. तथापि रहदारी पोलिसांच्या नाकर्तेपणाची शिक्षा आज कंटेनरमुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहन चालकांना भोगावी लागली.
त्यामुळे बेळगावचे रहदारी पोलीस हे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नसून फक्त वाहन चालकांची अडवणूक करून दंड वसूल करण्यासाठीच आहेत का? असा संतप्त सवालही केला जात आहे.