बेळगाव लाईव्ह:मंड्या जिल्ह्यातील केरगोडू गावामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सुरू केलेल्या हिंदू विरोधी कृत्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील जातीय सलोख्याला धक्का पोहोचवणाऱ्या राज्य सरकारला असे प्रकार तात्काळ थांबवण्याची सूचना करावी अन्यथा राज्य सरकार बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष बेळगाव महानगर आणि ग्रामीण जिल्हा यांच्यातर्फे राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव महानगर आणि ग्रामीण भाजपतर्फे आज सोमवारी सकाळी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातून भव्य मोर्चा काढून राज्यपालांच्या नावे उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ राज्यपालांकडे धाडण्याचे आश्वासन दिले. भारतीय जनता पक्षातर्फे काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चाचे नेतृत्व राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगावच्या खासदार मंगला अंगडी आणि महापौर शोभा सोमनाचे यांनी केले.
प्रारंभी चन्नम्मा चौकात निदर्शने करून काँग्रेस विरोधी घोषणा देत. जय श्रीराम जय जय श्रीराम, भारत माता की जय असा जयजयकार करत निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चामध्ये उपमहापौर रेश्मा पाटील, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेत्या उज्वला बडवानाचे यांच्यासह बेळगाव महानगर भाजप व बेळगाव ग्रामीण भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पक्षचिन्ह असलेले भगवे ध्वज हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, मंड्या येथील केरगोडू गावामध्ये अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त 108 ध्वजस्तंभ उभारून त्यावर हनुमंताची प्रतिमा असलेले ध्वज फडकवण्यात आले होते. मात्र रितसर परवानगी घेऊन फडकवलेले हे ध्वज राज्य सरकारच्या सूचनेवरून खाली उतरवण्यात आले.
खरे तर भगवा ध्वज आणि हनुमंताचा ध्वज हा वेगवेगळ्या वेळी फडकवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ही वस्तुस्थिती असताना पोलिस अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून जबरदस्तीने ते ध्वज खाली उतरून दुपारी त्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावले. राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी कायदे कानून आहेत, नियमावली आहे. ती सर्व धाब्यावर बसून देशाच्या ध्वजावरील आपलं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
मात्र हुबळीमध्ये देशाचा झेंडा फडकताना याच काँग्रेस सरकारने त्याला विरोध केला आहे. याचा आम्ही निषेध करतो. अशा घटना पुन्हा घडू नयेत. तशीच घटना एम. के. हुबळी येथे काल घडली आहे. त्याही घटनेचा निषेध करून येत्या काळामध्ये पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे माजी आमदार बेनके यांनी सांगितले.