बेळगाव लाईव्ह :शहापूर खडेबाजार रस्त्याला जोडणाऱ्या मिरापूर गल्ली रस्त्याच्या ठिकाणी एका बाजूला मोठ्या प्रमाणात पार्क केल्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या रहदारीच्या अडथळाकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहापूर तेथील मीरापूर गल्लीचा रस्ता आधीच अरुंद आहे. अलीकडच्या काळात हा रस्ता ज्या ठिकाणी खडेबाजार रस्त्याला मिळतो तेथे एका बाजूला मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे जवळपास चिंतामणराव हायस्कूलपर्यंतचा हा रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे.
यात भर म्हणून सध्या या ठिकाणी उभारण्यात आलेली स्वागत कमान अद्यापही काढण्यात आलेली नाही. परिणामी या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण झाला असून वाहन चालकांना विशेष करून चारचाकी वाहन चालकांना आपली वाहने जपून चालवावी लागत आहेत.
तेंव्हा येथे एखादा अपघात घडण्याची वाट न पाहता रहदारी पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.