बेळगाव लाईव्ह :वाशी (मुंबई) येथील दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये कर्नाटक सरकार बेळगाव सीमा भागातील मराठी संस्कृती व भाषा संपविण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यावर विचार व्हावा. तसेच आपण स्वतः येथील मराठी शाळा, वाचनालय साहित्य संमेलनं आणि मराठीचे संरक्षण संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी आवश्यक ती तरतूद करावी, अशी विनंती मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजी शांताराम अष्टेकर यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मराठी भाषा व शिक्षण विभाग मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
मध्यवर्तीय म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी गेल्या शनिवारी मंत्री दीपक केसरकर यांना उपरोक्त पत्र धाडले आहे. मुंबई वाशी येथे दुसरे विश्व मराठी संमेलन सुरू आहे.
मराठी भाषा संवर्धनाबाबत संमेलनात कांही निर्णय घेण्यात येतील आणि त्याचा उपयोग मराठी भाषिकांना होईल यात संशय नाही. संमेलनास महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा. साहेब सीमा भागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 67 वर्षे लढा देत आहे. आपली संस्कृती, लिपी, भाषा टिकविण्याचे काम करत असताना येथील सरकारच्या अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचा दावा प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकार येथील मराठी संस्कृती आणि भाषा संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर संमेलनात विचार होणे आवश्यक आहे. 2012 -13 आणि 2013 -14 सालच्या महाराष्ट्र सरकारच्या अंदाजपत्रकात माननीय अजित दादा पवार यांनी सीमा भागातील मराठी जनतेच्या संस्थांसाठी खास तरतूद करून मदत दिली होती. तथापी 2014 नंतर ही मदत बंद केली आहे.
आपण लक्ष घालून येथील मराठी शाळा, वाचनालयं, साहित्य संमेलने व मराठीचे संवर्धन संरक्षण करणाऱ्या उपक्रमशील संस्थांसाठी आवश्यक ती तरतूद करावी ही प्रार्थना. साहेब येथील वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी ही मराठी भाषेसाठी प्रयत्न करणारी संस्था असून या संस्थेचा 25 वा मराठी भाषा दिवस, रौप्य महोत्सवी वर्ष कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणार आहे.
याप्रसंगी आपण बेळगावला यावे व मराठी भाषिक व संस्था पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा ही विनंती, असा तपशील मंत्री केसरकर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे. मालोजी अष्टेकर यांनी आपल्या या पत्राची प्रत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांना देखील धाडली आहे.