बेळगाव लाईव्ह :शेतीसाठी परंपरागत ठेवलेले रस्ते व पायवाटा बंद केल्या जात असल्याच्या निषेधार्थ तसेच हा प्रकार ताबडतोब थांबवा, या मागणीसाठी येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांतर्फे येत्या गुरुवार दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्याचा निर्णय शेती सुधारणा युवक मंडळाने घेतला आहे.
येळ्ळूर रोड, गाडे मार्ग येथील शेतकऱ्यांना शेताकडे ये -जा करण्यासाठी परंपरागत रस्ते ठेवले आहेत. मात्र गेल्या कांही दिवसांपासून या भागामध्ये जमिनीची विक्री करून त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत.
परिणामी शेतीकडे जाणारे रस्ते बंद होत आहेत. शेतकऱ्यांकडून संबंधित नागरिकांना अनेक वेळा सूचना करूनही शेतीला उपयोगी ठरणारे रस्ते बंद केले जात आहेत. त्यामुळे शेतीवर गंडांतर येण्याची वेळ निर्माण झाली असून रस्ते नसल्याने शेती करणे कठीण झाले आहे.
एका आर्थिक संस्थेकडून या भागात बेकायदेशीरपणे प्लॅन आखून जमिनीची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतीला ये -जा करण्यासाठी असणारा मार्ग बंद झाला आहे. सदर गैरप्रकार ताबडतोब थांबविण्यात यावा.
तसेच शेतीकडे जाण्यासाठी असलेले परंपरागत रस्ते खुले ठेवावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वडगाव येथील कृषी पत्तीन संस्थे जवळ जमून मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, असे शेती सुधारणा युवक मंडळाने कळविले आहे.