बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील पीएमएफएमई (पंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग) योजनेंतर्गत 514 लाभार्थ्यांना अनुदानासह कर्ज देण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांकडून योग्य वापर होत आहे. त्यामुळेच या योजनेत बेळगावचा राज्यात पहिला आणि देशात पाचवा क्रमांक आला आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगून अधिकार्यांचे विशेष कौतुक केले.
जिल्हा पंचायत सभागृहात गुरुवारी कृषी, फलोत्पादन, रेशीम व पशुसंवर्धन खात्याच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकार्यांसमवेत झालेल्या विकास आढावा बैठकीत राहुल शिंदे अध्यक्षस्थानी होते.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कृषी यंत्र केंद्रांनी शेतकर्यांच्या सोयीसाठी काम करावे. कृषी विभाग हा शेतकर्यांच्या सर्वात जवळचा विभाग आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असल्याने प्रकल्प राबविण्याच्या सूचना सीईओ शिंदे यांनी अधिकार्यांना दिल्या.
कृषी विभागाचे सहसंचालक एस. बी. कोंगवाड म्हणाले, या पावसाळ्यात जूनमध्ये पाऊस न पडल्याने पेरणीची कामे लांबली. मात्र, जुलैमध्ये आलेल्या पावसामुळे 95 टक्के पेरण्या शक्य झाल्या.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पिकांचे नुकसान झाले. सुमारे 3.54 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद आहे. पीकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी 410.11 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.