बेळगाव लाईव्ह :आयोध्या येथे प्रभू श्रीराम विराजमान होत असल्याचे औचित्य साधून कपिलेश्वर कॉलनी येथील कपिलेश्वर वेल्फेअर सोसायटी (रिद्धी -सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट कमिटी) यांच्यातर्फे सोमवार दि 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना महोत्सव -2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महोत्सवांतर्गत सोमवारी श्री रिद्धी -सिद्धी विनायक मंदिर येथे सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत देव यज्ञ होम (अग्निहोत्र) होणार असून सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत स्वरगंध भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. तसेच सकाळी 11 ते 12:30 वाजेपर्यंत सिद्धकला भजनी मंडळाचा कार्यक्रम तर 12:30 ते 1 वाजेपर्यंत कपिलेश्वर कॉलनीमधील माता-भगिनींकडून प्रभू श्रीरामचंद्र आधारित नृत्य कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी 2:30 ते 3:15 वाजेपर्यंत हनुमान चालीसा आणि विष्णुसहस्त्रनाम पठण होणार आहे. दुपारी 3:15 ते 4 वाजेपर्यंत रामकृष्ण मिशन आश्रम बेळगाव येथील प.पू. स्वामीजी यांचे राम संकीर्तन व भजन तसेच दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हभप श्री परशराम कनगुटकर महाराज (सोनोली) यांचे कीर्तन होईल. त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता मंदिरात दीपोत्सव साजरा होण्याबरोबरच 6 ते 7 वाजेपर्यंत इस्कॉन मंदिरतर्फे नृत्य, भजन, कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांची सांगता रात्री 8:30 वाजता महाआरतीने होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्व भक्त मंडळींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
श्रीराम भक्त सेवा संघ टिळकवाडीतर्फे 22 रोजी महाप्रसाद
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून आगरकर रोड, टिळकवाडी येथील श्रीराम भक्त सेवा संघातर्फे येत्या उद्या रविवार दि. 21 आणि सोमवार दि 22 जानेवारी रोजी महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम भक्त सेवा संघ टिळकवाडी यांच्यातर्फे उद्या रविवारी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महिला भजनी मंडळाचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता श्रीरामाची पालखी सेवा श्री मारुती मंदिर, दुसरे रेल्वे गेट येथून प्रारंभ होऊन रानडे रोड, आगरकर रोड, नेहरू रोड मार्गे सकाळी 10 वाजता श्री शिवमंदिर, आगरकर रोड येथे समाप्त होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता प्रभू श्रीरामांची पूजा होणार असून दुपारी 1:30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत प्रत्येक घरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. तरी उपरोक्त कार्यक्रमांसह महाप्रसादाचा सर्वांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम भक्त सेवा संघ टिळकवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.