बेळगाव लाईव्ह :बेळगाव एपीएमसी यार्ड अर्थात मार्केट येथे दिवसाढवळ्या लाखो रुपयांच्या चोरीची घटना घडली ती सीसिटीव्हीत कैद झाली आहे भर रस्त्यात दुचाकीच्या डिकीतील लाखो रुपये लंपास करण्याच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदर चोरीचा प्रकार कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यात मालवाहू ट्रक शेजारी एक सफेद रंगाची दुचाकी पार्क केलेली दिसते.
त्या दुचाकीपासून थोड्या अंतरावर काळ्या पॅन्टवर सफेद रंगाचा शर्ट इन शर्ट केलेला एक सभ्य वाटणारा चोरटा स्वतःच्या सफेद रंगाच्या दुचाकी शेजारी थांबलेला दिसतो. त्यानंतर तो चोरटा आसपासचा अंदाज घेत ट्रक शेजारील दुचाकी स्वतःचीच असल्याच्या अविर्भावात चावीने सहजपणे दुचाकीची डिकी उघडून आतील पैशाची बॅग ताब्यात घेतो.
तसेच आपण कांहीच केले नसल्याच्या अविर्भावात चोरलेली बॅग घेऊन जवळच उभ्या केलेल्या आपल्या दुचाकी वरून निघून गेल्याचे दिसून येते. सदर चोरट्याने लंपास केलेल्या बॅगेमध्ये लाखो रुपयांची रक्कम असल्याचे समजते. चोरीचा सदर प्रकार उघडकीस येताच एपीएमसी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.