बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून पैसे उकळण्याचे तसेच कर्मचारी वेळेवर हजर राहात नसल्याचे आरोप पुढे आल्याने आज जिल्हा सचिव अंजुम परवेज यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा रुग्णालयाची कार्यशैलीची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याने जिल्हा सचिवांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केल्याची माहिती यावेळी प्रसारमाध्यमांना देण्यात आली. यावेळी वैद्य आणि कर्मचाऱ्यांच्या हजेरीची तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय सेवा आणि नूतन कामकाजाचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जिल्हा सचिव अंजुम परवेज यांनी आपण जिल्हा रुग्णालयाच्या एकंदर कार्यशैलीची तपासणी करण्यासाठी आलो असून आपल्याला मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याचे सांगितले.
आजच्या पाहणी दौऱ्यात आपण वैद्य, वैद्यकीय सेवा, वैद्य आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची हजेरी, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, इमारतीची सध्यस्थिती यासह विविध गोष्टींची पाहणी केल्याचे सांगितले. शिवाय लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटनही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणी, सीईओ शिंदे, अण्णासाब पाटील आदी सहभागी होते.