बेळगाव लाईव्ह:अंगणवाडीतील मुलांनी फुले तोडल्याचे निमित्त होऊन एका अंगणवाडी सहाय्यिकेवर (हेल्पर) गावातीलच एका इसमाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे नाक कापले जाऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना बसुर्ते (ता. जि. बेळगाव) येथे घडली आहे. सध्या त्या अंगणवाडी सहाय्यिकेवर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
जखमी अंगणवाडी सहाय्यिकेचे नांव सुगंधा गजानन मोरे (वय 50) असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की बसुर्ते गावातील अंगणवाडीमध्ये सुगंधा मोरे या गेल्या अनेक वर्षापासून हेल्पर म्हणून काम करत आहेत.
समजलेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी 12 च्या सुमारास अंगणवाडीतील मुलांना बाहेर सोडण्यात आले होते. त्यावेळी त्या लहान चिमूरड्या मुलांनी शेजारील कल्याणी ज्योतिबा मोरे यांच्या घराच्या अंगणातील फुले तोडली. सदर प्रकार घर मालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या प्रकाराला सुगंध मोरे यांनाच जबाबदार धरून अर्वाच्य शिवीगाळ करत त्यांच्यावर विळ्याने हल्ला केला.
या हल्ल्यात सुगंधा जखमी झाल्या असून त्यांच्या चेहऱ्यावर विळ्याचे वार झाल्याने त्यांचे नाक कापले गेले आहे. सदर घटनेनंतर सुगंधा यांना तातडीने बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र नाक कापले गेल्यामुळे रक्त फुफुसात जाऊन प्रकृती गंभीर झालेल्या सुगंधा यांना त्यानंतर अधिक उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, बेळगाव सारख्या खुद्द राज्याच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जिल्ह्यात, शहर परिसरातच अलीकडे महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढू लागल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
न्यू वंटमुरी येथे अलीकडेच एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्याला अजून महिनाही उलटत नाही तोवर आता बसुर्ते येथे अंगणवाडी सहाय्यिकेवर हल्ला चढवून तिचे नाक कापण्याचा निंद्य प्रकार घडल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.