बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हलगा मच्छे बायपासचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. मात्र सदर रस्त्याचे कामात न्यायालयीन अडथळा असल्याने काम सुरू होणार की नाही याबाबत साशंकता आहे.
वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामाला न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे विलंबाला तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सदर बायपासचे काम लवकरच सुरू होईल असे नुकतेच जाहीर केले असते तरी न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे ते काम सुरू होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काहीं वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सदर बायपास रस्त्याचे बांधकाम करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि त्याला पहिल्याच दिवसापासून शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. कांही वेळा प्राधिकरणाने पोलीस संरक्षणात या रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.
मध्यंतरी शेतकऱ्यांचा विरोध दाबून सपाटीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत ‘झिरो पॉईंट’ निश्चित झाल्याशिवाय काम हाती घेता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या या आदेशामुळे हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम आता पुन्हा हाती घेण्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाला नव्याने नोटिफिकेशन जाहीर करावे लागणार आहे. तथापि पालकमंत्री जारकीहोळी यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना सदर बायपास करण्याबाबत असलेल्या अडसर दूर झाला आहे. मात्र कंत्राटदार नसल्याने काम सुरू केलेले नाही लवकरच याबाबत निर्णय घेऊन कामाला वेगाने सुरुवात केली जाणार असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, शेतकऱ्यांचे वकील ॲड. रवीकुमार गोकाककर यांनी या संदर्भात बोलताना हलगा -मच्छे बायपास बांधकामाला स्थगिती आहे. त्यामुळे काम सुरू करता येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांनी काम सुरू होणार असल्याची माहिती दिली असली तरी शेतकऱ्यांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचे मतही व्यक्त केले आहे.