Thursday, December 19, 2024

/

चोरट्यांचा हैदोस; पाच पैकी तीन घरातील लाखोंचा एवज लंपास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पोलीस यंत्रणा अधिवेशनात व्यस्त असताना चोरट्यांनी डल्ला मारला असून बेळगाव शहरातील एकाच गल्लीतील पाच घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी पहाटे आनंदनगर आणि साई कॉलनी, वडगाव येथे घडली. या धाडसी चोरीच्या प्रकारामुळे संबंधित परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील वडगाव येथील आनंदनगर आणि साई कॉलनीमध्ये आज बुधवारी पहाटे दहशत निर्माण करत चोरट्याने तब्बल पाच घरांमध्ये धाडसी चोरी केली. पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान सर्वप्रथम आनंदनगर पहिला क्रॉस येथील शिव मंदिरासमोरील एका घराच्या दर्शनीय दरवाजाचा कडीकोयंडा बेमालूमपणे तोडून घरात प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी सुमारे 16 तोळे सोने लांबविले. घरातील मंडळी पहाटेच्या साखर झोपेत असल्याची संधी साधून चोरट्याने आपला डाव साधला. त्यानंतर आनंदनगर दुसरा क्रॉस येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या रतनकुमार जांगिड यांच्या घरातील चांदीच्या वस्तू व दागिन्यांना हात न लावता चोरट्याने फक्त सोन्याचे दागिने लंपास केले जांगिड कुटुंबीय परगावी गेले असल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बंद असलेल्या त्यांच्या घराला चोरट्याने लक्ष्य केले.

चोरट्यांनी किती किमतीचे दागिने रंपास केले हे जांगिड कुटुंबीय घरी परतल्यानंतर स्पष्ट होणार आहे. जांगिड यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्याच गल्लीतील संतोष पवार यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घराच्या दरवाज्याला इंटरलॉक सिस्टीम असल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला.

पवार यांच्या घरातील चोरीचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा त्यांच्या शेजारी अनिल गोकाक यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. गोकाक यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील दोन सोन्याच्या साखळ्या, इयर रिंग्स वगैरे दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. त्यानंतर आनंदनगर साई कॉलनी येथील ज्ञानेश्वर पावशे यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरट्याने थेट बेडरूम गाठले. तसेच पावशे कुटुंब गाढ झोपेत असताना कपाटातील सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख लंपास केले. मात्र तत्पूर्वी दरवाज्याच्या आवाजाने ज्ञानेश्वर यांच्या आई जाग्या झाल्या. मात्र आरडाओरड करून मुलाला उठवल्यास चोरटा त्याला इजा करतील. या भीतीने त्यांनी स्वतःच एका चोरट्याची कॉलर पकडली. दरम्यान जाग्या झालेल्या घरच्या सुनेने चोर चोर म्हणून आरडाओरड केली. मात्र चोरट्याने दोघींनाही धारदार शस्त्राचा धाक दाखवून जवळच्या शेतातून पोबारा केला.

सदर चोरीच्या प्रकाराची माहिती शहापूर व टिळकवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भाव घेऊन तपास कार्य हाती घेतले. घटनेचा पंचनामा करण्याबरोबरच यावेळी ठसे तज्ञ आणि पोलीस श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस श्वान पथक घटनास्थळापासून कांही अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.Shahapur police station

चोरीचा प्रकाराबद्दल बोलताना आनंदनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष असलेले संतोष पवार म्हणाले की, आमच्या परिसरात एकूण 5 घरांमध्ये चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापैकी तीन ठिकाणी ते यशस्वी झाले, मात्र दोन ठिकाणी चोरी करण्यात अयशस्वी झाले. चोरट्यानी माझ्या घराचे दोन दरवाजा देखील फोडण्याचा प्रयत्न केला. घरात आम्ही दहा लोक असताना चोरट्यांनी हे धाडस दाखवले. तथापी दोन्ही दरवाजे चांगले गोदरेजच्या लॉकचे असल्यामुळे आमच्या सुदैवाने चोरट्यांना घरात शिरता आले नाही.

घरात लोक असताना देखील चोरटे या पद्धतीने चोऱ्या करत असल्यामुळे आनंदनगर व साई कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी व्यस्त आहे हे मान्य असले तरी त्यांनी सर्वसामान्य जनतेची काळजी देखील गरजेचे आहे. घरात लोक असताना चोरटे कसे काय चोरी करण्याचे धाडस दाखवू शकतात? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. तेंव्हा पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आनंदनगर व साई कॉलनी येथे रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.