बेळगाव लाईव्ह : राज्यातील शालेय अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये वेद उपनिषदांच्या माहितीसह टिपू सुलतानचा धडा देखील समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यात भाजप सरकार अस्तित्वात असताना मुघल, टिपू सुलतान वगैरेंची प्रशंसा करणारे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले होते. त्या ऐवजी वेद, उपनिषदांच्या माहितीचा समावेश करण्यात आला होता.
आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने जातीधर्मावर आधारित वादग्रस्त विषय टाळून काळानुसार आवश्यक विषयांचा पुस्तकात समावेश केला आहे. इतिहासाची माहिती देताना वेद, उपनिषदांच्या धड्या सोबतच मुघल, औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या धड्यांचा पुस्तकात समावेश केला आहे.
पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात पूर्णपणे बदल न करता केवळ कांही दुरुस्त्या केल्याचे पाठ्यपुस्तक समितीतील सदस्य सांगतात. मुलांसाठी आवश्यक तेवढेच माहिती पुस्तकात देण्यात आली असून शैक्षणिक विषयांना प्राधान्य देऊन कांही बदल करण्यात आले आहेत.
समजण्यास खूप जड असणारी कांही तत्वे, आदर्श वगळण्यात आली आहेत. एकंदर मुलांच्या वयोमानानुसार पाठ्यपुस्तकांमधील विषयांमध्ये योग्य ते बदल करण्यात आल्याचे समजते. भाजप सरकार अस्तित्वात असताना रोहित चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली पाठ्यपुस्तक समिती स्थापन करण्यात आली होती. आता काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात डॉ. मंजुनाथ हेगडे यांच्या नेतृत्वाखाली 37 जणांची पाठ्यपुस्तक समिती नेमण्यात आली आहे.