बेळगाव लाईव्ह :हुबळीहून बेळगावपर्यंत आलिशान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावणार हे वृत्त प्रसिद्ध झाले, त्यानंतर प्रायोगिक स्वरूपात वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत धावली देखील आणि त्यामुळे समस्त बेळगावकरांना अत्यानंद झाला. मात्र हा आनंद क्षणिक ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण कांही तांत्रिक कारणास्तव ही रेल्वे अद्यापही बेळगावपर्यंत सुरू झालेली नाही.
बेंगलोरला उत्तर कर्नाटकातील जिल्हे जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढवावी अशी मागणी नागरिकांनी लावून धरल्यामुळे गेल्या 21 नोव्हेंबर रोजी बेंगलोर बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची चांचणी घेण्यात आली. यामुळे बेळगाव परिसरातील प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
अवघ्या साडेसात तासांमध्ये बेळगाव बेंगलोर मार्गावर आलिशान प्रवास करता येणार असल्याने वंदे भारत रेल्वे केंव्हा नियमित सुरू होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. दरम्यान कांही तांत्रिक अडचणीमुळे बेळगाव पर्यंत वंदे भारत रेल्वे सेवा देता येत नसल्याचे रेल्वे मंत्र्यांनी बेळगावच्या खासदारांकडे स्पष्ट केले आहे. बेळगाव पर्यंत सदर सेवा वाढवण्यास हुबळी मधून विरोध झाला होता त्यामुळे हुबळी मधील राजकीय विरोध या विलंबास कारण आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तथापि जर बेळगावपर्यंत या रेल्वेची सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही तर आपण रेल्वे बोर्डाच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्याचा इशारा बेळगावच्या खासदारांनी दिल्याचे समजते. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी देखील तांत्रिक कारणामुळे वंदे भारत रेल्वे बेळगाव पर्यंत जाऊ शकत नाही असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि आपण स्वतः रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित तांत्रिक समस्या कशा सोडवता येतील आणि बेळगावपर्यंत वंदे भारत रेल्वे बेळगाव पर्यंत कशी धावेल या संदर्भात चर्चा करणार असल्याचेही कडाडी यांनी स्पष्ट केले.
बेंगलोर -बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्यास हुबळी -धारवाडच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याने तेथील नागरिकांकडून विरोधाचा सूर उमटत आहे. बेळगावला वंदे भारत सुरू झाल्यास हुबळी -धारवाडचे महत्व कमी होईल अशी चिंता तेथील प्रवाशांना असल्यामुळे हा विरोध होत आहे. बेळगावमध्ये वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेसाठी आवश्यक कांही सोयी नसल्याचे समजते.
तथापि मागील कांही दिवसांपासून त्यांची पूर्तता केली जात असून रेल्वेत पाणी भरण्यासाठी वॉटर फिलिंग व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 दरम्यान खांब उभे करण्यात आले आहेत. त्यावर जलवाहिनी बसविली जाणार आहे. याबरोबरच इतर सुविधाही रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बेळगावपर्यंत केंव्हा सुरू होणार? याबाबतची अधिकृत माहिती नैऋत्य रेल्वेने अजून तरी जाहीर केलेली नाही. तथापि रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.