बेळगाव लाईव्ह :शेंडूर (ता. निपाणी) येथे पवनचक्कीचा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीकडून तेथील शेतकऱ्यांवर केला जाणारा अन्याय तात्काळ थांबवावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेंडूर येथील अन्यायाग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर करण्यापूर्वी संघाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हला माहिती देताना शेंडूर येथील पांडुरंग शिवाजी मिसाळ या शेतकऱ्यानी सांगितले की, शेंडूर (ता. निपाणी) येथे पवनचक्कीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प ज्या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैलगाड्या व ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून स्व:खर्चाने या रस्त्याची निर्मिती केली आहे. मात्र पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीकडून आता या रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.
त्याबद्दल जाब विचारणाऱ्या अथवा आक्षेप घेणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात पोलीस कारवाई केली जात आहे. एवढे करून न थांबता आम्ही शेतकऱ्यांनी तयार केलेला रस्ता जणू स्वतः तयार केला असल्याप्रमाणे 19 लाख रुपयांचा खर्च दाखवून बिल काढण्यात आले आहे.
सदर कंपनीकडून रात्रीच्या वेळीच पवनचक्कीचे काम केले जाते, त्यांचे काम रात्री 10 नंतर सुरू होते. पोलीसही त्यावेळी येतात आणि संबंधित रस्ता कंपनीचा आहे असे सांगून आम्हा शेतकऱ्यांना दमदाटी करतात. माझ्यासह अन्य काही शेतकऱ्यांवर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. आमच्या तक्रारींची मात्र पोलिसांकडून दखल घेतली जात नाही.
थोडक्यात पोलीस अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी कंपनीचीच बाजू घेत असतात, असा आरोप पांडुरंग मिसाळ यांनी केला. शेंडूर येथे विंडरेन ही कंपनी पवन चक्कीचा प्रकल्प उभारत आहे. हा प्रकल्प उभारण्यापूर्वी तेथील कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात घेण्यात आलेले नाही किंवा कंपनीने स्वतःचा रस्ता ही तयार केलेला नाही. रस्ता करायचा झाल्यास त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे अन्य एका शेतकऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.