Friday, December 20, 2024

/

खादरवाडी जमीन प्रकरणी पोलीस स्थानकाला घेराव

 belgaum

बेळगाव लाईव्ह:खादरवाडी (ता. बेळगाव) येथे माती उत्खननासाठी विकलेल्या शेतजमिनीवरून दोन गटांत सोमवारी रात्री वाद झाला. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिसांनी एका गटातील १५ जणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सुमारे अडीशे हून अधिक ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून दुसऱ्या गटावरही गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.

खादरवाडीतील काही शेतजमीन माती उत्खननासाठी विकलेली आहे. विक्री करताना ठरलेली किंमत व प्रत्यक्षात दिलेल्या किमतीत तफावत आहे. शिवाय आणखी काही जमीन देव-घेवीचाही वाद आहे. याबाबत गावात दर सोमवारी बैठक होते.

सोमवारीही यावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु होती. परंतु, शाब्दीक बाचाबाची होऊन वाद निर्माण झाला. त्यातून काहींना धक्काबुक्की झाली. यामध्ये एका गटातील दोघेजण जखमी झाले. त्यांनी रात्रीच वडगाव पोलिस ठाणे गाठून वाद घालणाऱ्यांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेत चौघांना अटक केली.Gherao

पंधरा जणांवर गुन्हा व चौघांना अटक झाल्याचे समजताच ग्रामस्थ संतप्त झाले. मंगळवारी सायंकाळी सुमारे २०० हून अधिक लोक टेम्पो व मिळेल त्या वाहनाने येऊन वडगाव पोलिस ठाण्यासमोर जमले. आमच्या गटातील दोघांनाही मारहाण झाली आहे. ते देखील जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तक्रार घेऊन संबंधितांना तातडीने अटक करा, अशी मागणी करत त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.

पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या १५ जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी जे दोषी आहेत त्यांच्यावरच कारवाई होईल, उर्वरितांना अटक होणार नाही. तुमचीही जी तक्रार आहे, ती लिहून द्या त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या गटानेही काही जणांविरोधात फिर्याद लिहून दिली आहे. त्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. यावेळी  ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने वडगाव पोलिस ठाण्यासमोर जमल्या होत्या.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.