बेळगाव लाईव्ह :31 डिसेंबर अर्थात ‘थर्टी फर्स्ट’ तोंडावर आला असून ओल्ड मॅनच्या दहनाद्वारे सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. यासाठी शहर परिसरातील ओल्ड मॅन तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडून ओल्ड मॅनच्या प्रतिकृतींवर अखेरचा हात फिरविला जात आहे.
बेळगाव शहरवासीयांनी सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. उद्या 31 डिसेंबर रोजी रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच शहरात परिसरात ठिकठिकाणी ‘ओल्ड मॅन’ उभे करून दहनासाठी सज्ज ठेवले जाणार आहेत.
नव्या 2024 या वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्याबरोबरच सरत्या वर्षाला निरोप देताना उद्या 31 डिसेंबरच्या रात्री वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी या ओल्ड मॅनचे दहन केले जाणार आहे. पूर्वी गल्लीतील युवक हौसेपोटी एकत्र येऊन ओल्ड मॅन तयार करत असत. मात्र अलीकडच्या काळात या हौसेने व्यावसायिक स्वरूप धारण केले असून तयार ओल्ड मॅन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत.
त्यासाठी दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरात विशेष करून कॅम्प परिसरात अनेक ठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले असून तयार ओल्ड मॅन प्रतिकृतींवर अखेरचा हात फिरवला जात आहे.
कॅम्प येथील कांबळे व मोरे कुटुंबीय दरवर्षी विविध प्रकारचे आणि उंचीचे ओल्ड मॅन तयार करून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करतात. सदर कुटुंबातील सर्व सदस्य 31 डिसेंबरजवळ येऊ लागला की एकत्रितपणे ओल्ड मॅन तयार करण्याच्या कामाला लागतात. ओल्ड मॅन तयार करण्यासाठी गवत, बांबू, रट्ट, तट्ट, वृत्तपत्रं आणि घोटीव कागदांचा वापर केला जातो.
बेळगाव लाईव्हशी बोलताना मोरे कुटुंबातील नैतिक निशिकांत मोरे याने सांगितले की, दरवर्षी आम्ही विक्रीसाठी ओल्ड मॅन तयार करत असतो. यंदा लहान मोठे 36 ओल्ड मॅन तयार केले आहेत असे सांगितले यापैकी फातिमा चर्च व झेवियर चर्च साठी तयार करण्यात आलेले ओल्ड मॅन मोठे आहेत आम्ही तयार केलेल्या ओल्ड मॅन पैकी बहुतांश ओल्ड मॅन हे टिळकवाडी, अनगोळ, शहापूर वगैरे भागातील ऑर्डर घेऊन तयार केले आहेत. घरगुती समस्येमुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आम्ही कमी ऑर्डरी घेतल्या आहेत. 31 डिसेंबर जवळ आले की आम्ही घरातील सर्वजण ओल्ड मॅन तयार करण्याच्या कामाला लागतो माझे वडील टोप्या तयार करतात, आई ओल्ड मॅन प्रतिकृतींवर अखेरचा हात फिरवते, माझा भाऊ ओल्ड मॅनच्या चेहऱ्यांची रंगरंगोटी करतो या पद्धतीने आम्ही सर्वजण कामं विभागून घेऊन ओल्ड मॅन तयार करतो. शहरातीलच नव्हे तर गोव्याहून देखील आम्हाला ओल्ड मॅन तयार करण्याची ऑर्डर मिळते.
आम्ही यावेळी 2 फुटापासून 10 ते 15 फूट उंचीचे ओल्ड मॅन तयार केले आहेत. आमच्याकडील ओल्ड मॅनची किंमत त्याच्या उंची व आकारानुसार असते. तीन फुटाच्या ओल्ड मॅनची किंमत 1000 रु., 5 फुटासाठी 3000 रुपये, सात साडेसात फुटी ओल्ड मॅनला 4000 रुपये आणि त्यापेक्षाही उंच असलेल्या ओल्ड मॅन प्रतिकृतीची किंमत 6000 ते 8000 रुपये इतकी आहे, अशी माहिती नैतिक मोरे याने दिली.