बेळगाव लाईव्ह :बेळगावातील न्यू वंटमुरीत महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढण्यात आली. ही घटना धक्कादायक आहे. पण या घटनेचे वृत्तांकन सवंग पद्धतीने केल्याबाबत तीव्र नाराजी आहे. संबंधित प्रसारमाध्यमांविरुद्ध स्वयंप्रेरित तक्रार दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने अॅडव्होकेट जनरलना दिला आहे.
मुख्य न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि न्यायमूर्ती एम. जी. एस. कुमार यांच्या नेतृत्वाखालील विभागीय खंडपीठाने मंगळवारी (दि. १२) सकाळी कामकाज सुरू केले. सर्वप्रथम बेळगावातील घटनेविषयी त्यांनी चर्चा केली. घडलेली घटना किती क्रूर आहे हे सर्वांच्या लक्षात येते; पण काही वृत्तपत्रांनी मर्यादा ओलांडून घटनेबाबत सवंग वृत्त प्रसिद्ध केले. हे त्या घटनेपेक्षा क्रूरपणाचे आहे. एकीकडे देश ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. दुसरीकडे अशा क्रूरपणाच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळेमाणुसकीला मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
ही खरोखर ‘हृदयविद्रावक’ अशी घटना असल्याचे मत विभागीय खंडपीठाने व्यक्त केले.
महिला मंत्र्याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत असल्याचे छायाचित्र एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. त्या महिलांचे चेहरे पुसट दाखविण्यात आले आहेत. पण इतर काही दैनिकांनी हा विषय सवंग पद्धतीने मांडला आहे. आक्षेपार्हरीत्या घटनेचे वार्तांकन केले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर सर्व सीमा पार केल्या आहेत. हे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. या घटनेकडे संवेदनशीलनेते पाहावे, पीडितेच्याकोणत्याही घटनेचे वृत्तांकन करण्यास बंदी घातलेली नाही.
प्रसारमाध्यमांना असणाऱ्या स्वातंत्र्यावर कधीच गदा आणलेली नाही; पण वृत्तांकन करताना नियम आणि मर्यादांचे भान राखण्याची ताकीद न्यायालयाने दिली. याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी वस्तुस्थिती मांडण्याची सूचना अॅडव्होकेट जनरल के. शशीकिरण शेट्टी यांना दिली.
भावनांचा विचार प्रसारमाध्यमांनी करणे गरजेचे आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. ‘राष्ट्रीय, राज्य किंवा कोणत्याही पातळीवरील प्रसारमाध्यमांनी पीडितेची मुलाखत किंवा व्हिडिओ प्रसारित करु नये, असे न्यायालयीन निर्देश देण्यात आले होते. पण, त्याचे उल्लंघन करण्यात आले. प्रसारमाध्यमांनी असे व्हिडिओ प्रसारित केले असतील तर ते तात्काळ काढून टाकण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
घटना अशी : बेळगावातील न्यू वंटमुरीत प्रेमप्रकरणातून सोमवारी (दि. ११) रात्री ही घटना घडली. मुलाने प्रेयसीला पळवून नेले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याच्या आईवर हल्ला केला. तिला विवस्त्र करुन धिंड काढली. त्यानंतर खांबाला बांधून मारहाण केली. घरावर दगडफेक करुन वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केली असून पीडित महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी विधानसभेतही या विषयावर चर्चा झाली.