Thursday, December 19, 2024

/

खादरवाडीवासियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव दक्षिणचे आमदारांनी खादरवाडी येथील शेतकऱ्यांना फसवून हडप केलेली जमीन पूर्ववत संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी, अशी मागणी संतप्त खादरवाडीवासियांनी भव्य धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद शेतकरी नेते राजू मरवे आदींच्या नेतृत्वाखाली खादरवाडीवासियांनी उपरोक्त मागणीसाठी आज बुधवार सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

सदर मोर्चामध्ये खादरवाडी येथील गावकरी व शेतकऱ्यांसह बहुसंख्येने सहभागी झालेल्या शेतकरी महिला साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता झाल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार निदर्शने करून बेळगाव दक्षिणचे आमदारांचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने त्यांची व्यथा मांडून निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.Khadarwadi

गेल्या 1948 सालापासून खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या नावावर असलेली डोंगराची जमीन बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी आणि त्यांच्या एजंट आणि शेतकऱ्यांची फसवणूक करून हडप केली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक करण्यात आली याची तपशीलवार माहिती देऊन ती जमीन पूर्ववत संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित डोंगर (वारी) शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा पुरवठा करणारा साठा आहे. हा डोंगर विकला गेला तर जनावरांची उपासमार होईल त्याचप्रमाणे डोंगराच्या ठिकाणी असलेल्या देवस्थानाच्या पायथ्याशी पाण्याचा जिवंत झरा आहे. गेली 75 वर्षे या झऱ्याचे पाणी गावचे लोक कोणताही खर्च नसताना, मोटर-पंपसेट न वापरता पिण्यासाठी वापरत आहेत.

त्यामुळे सदर जमिनीची विक्री झाल्यास गावकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. या झऱ्याच्या आसपास 500 मी. पर्यंत कोणतीही बांधकाम होऊ नये. कारण या झऱ्याचे ओव्हरफ्लो झालेले पाणी खादरवाडीच्या धरणामध्ये येते. त्या पाण्याचा उपयोग खादरवाडी आणि पिरनवाडी येथील शेतकरी आपल्या जनावरांना पिण्यासाठी व इतर कारणासाठी करत असतात. तेंव्हा या गोष्टींचाही विचार करून खादरवाडी डोंगराच्या ठिकाणी असलेल्या जमिनीचा सर्व विक्री करार रद्द करावा आणि खादरवाडी गावच्या जनतेला न्याय द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन दक्षिणच्या आमदारांकडून कशाप्रकारे हडपण्यात आली आहे याची माहिती दिली. त्याचप्रमाणे येत्या महिन्याभरात विक्री करार रद्द करून संबंधित जमीन पूर्ववत शेतकऱ्यांच्या नावे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.