बेळगाव लाईव्ह: म्हैसूर राज्याचे कर्नाटक असे नामकरण होऊन यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कर्नाटक सेलिब्रेशन-50 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बेळगावात सुवर्णविधानसौध प्रांगणात 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष यू.टी.खादर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी आणि विधानसभा अध्यक्ष यु.टी.खादर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुढे बोलताना खादर म्हणाले, या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यापूर्वीच माहिती देण्यात आली असून कार्यक्रमाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे. 1 तास रंगमंचाचा कार्यक्रम आणि 2 तास सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
त्या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रीमंडळ सदस्य, आमदार, विधान परिषद सदस्य आणि सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विधानसभेच्या सर्व आजी-माजी अध्यक्षांना आणि विधानपरिषदेच्या अध्यक्षांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात प्रसिद्ध झालेल्या अल्वास विरासत आणि अल्वास नुडिसिरी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन १२ डिसेंबर रोजी सुवर्ण विधान सौधाच्या प्रांगणात करण्यात आले असून, उत्तर कर्नाटकातील लोकांना दक्षिणेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची विशेष संधी देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यासह या भागातील सर्व जिल्ह्यातील जनतेला हा कार्यक्रम खुला आहे. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, तरुण, महिला, मुले, कर्मचारी अशा सर्वांसाठी योग्य वाहतूक व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.