बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरानजीकच्या वंटमुरी गावातील एका महिलेला आज सोमवारी पहाटे 3 वाजता एका भयानक परीक्षेला सामोरे जावे लागले, जेंव्हा संतप्त जमावाने तिचे कपडे फाडून विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटने प्रकरणी काकती पोलिसांनी 7 पुरुषांना ताब्यात घेतल्या असून दोघेजण फरारी आहेत.
सार्वजनिक ठिकाणी महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्याच्या या घटनेनंतर वंटमुरी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण झालेली पीडित महिला आणि गुन्हेगार हल्लेखोर हे एकाच समुदायातील आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंटमुरी गावातील एक 24 वर्षीय युवक आणि 18 वर्षीय मुलगी हे प्रेमीयुगल काल रात्री 12:30 वाजता घरातून पळून गेले. याबाबतची माहिती मिळताच मुलीचे माता-पिता आणि नातेवाईकांनी त्या युवकाच्या घराकडे धाव घेतली. तसेच त्यांनी त्या युवकाच्या आईवर अमानुष हल्ला चढवून तिला फरफटत आणून रस्त्याशेजारी विजेच्या खांबाला बांधून घालून बेदम मारहाण केली.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेवर हल्ला करण्यापूर्वी जमावाने तिच्या अंगावरील वस्त्रे फाडून तिला विवस्त्र केले. सदर प्रकाराची माहिती मिळताच पहाटे 4 वाजता घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे.
तथापि अन्य दोन संशयितांनी फरारी होण्यात यश मिळविले. सदर घटनेबाबत पीडित महिलेकडून अधिक माहिती घेऊन सखोल चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, सदर घटनेची राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. ते म्हणाले की, मी स्वतः घटनास्थळी जाणारा असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या त्या पीडित महिलेचीही भेट घेणार आहे. पोलिसांनी सध्या 7 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल. त्याखेरीस सदर प्रकरणी आवश्यक ती अन्य कार्यवाही केली जाईल अशोक नायक नामक 28 वर्षाच्या युवक आपली प्रेयसी प्रियांका हिच्या सोबत पळून गेला आहे.
याबाबतची माहिती मिळताच प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्या युवकाच्या घरी जाऊन घरात एकटीच असलेल्या त्याच्या आईला घराबाहेर काढून विवस्त्र करून मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा नोंद करून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे संबंधित महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांच्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे पळून गेलेल्या त्या प्रेमीयुगूलाचा देखील शोध घेतला जात आहे असे सांगून राज्यात कायद्याचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, मग ते कोणी का असोत.कायद्याचा भंग करणारे कोणत्याही पक्षाचे अथवा कोणत्याही संघटनेचे असोत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले.