Friday, December 20, 2024

/

मंत्री जारकीहोळी यांची केंद्रीय मंत्री गडकरींशी महत्त्वाची चर्चा

 belgaum

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय वाहतूक, रस्ते व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

शहरातील फ्लाय ओव्हरला केंद्रीय मंत्र्यांकडून हिरवा कंदील

नव्या फ्लाय ओव्हरच्या उभारणीद्वारे लवकरच बेळगाव शहर आवश्यक मोठ्या वाहतूक व्यवस्थापनाच्या बदलाला सामोरे जाणार आहे. कारण राष्ट्रीय मार्गाजवळील हॉटेल संकम येथून सम्राट अशोक चौक मार्गे पिरनवाडीपर्यंतच्या फ्लाय ओव्हर प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

सदर फ्लाय ओव्हर पहिल्या टप्प्यात मध्यवर्तीय बस स्थानकापर्यंत (सीबीटी) उभारण्यात येईल आणि त्यानंतर पुढे तो पिरनवाडीपर्यंत विस्तारित केला जाईल. या फ्लाय ओव्हरच्या दोन्ही बाजूला आवश्यक ठिकाणी वळण्याचे तसेच प्रवेश (एन्ट्री) आणि निर्गमन (एक्झिट) मार्ग असणार आहेत. बेंगलोर येथे काल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विकास आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बेळगाव मधील दोन फ्लाय ओव्हर्स आणि जिल्हाधिकारी कार्यालय संकुल यांच्या उभारणीच्या प्रकल्पांसह अन्य विकास कामांची यादी गडकरी यांना सादर केली. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित विकास कामांना मंजुरी देण्याबरोबरच प्रकल्पांसाठी आवश्यक निधीदेखील पुरवला जाईल असे आश्वासन दिले आहे.

बेंगळूर येथील लीला पॅलेसमध्ये काल मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महामार्ग योजना प्रगती आढावा बैठकीमध्ये सहभागी होऊन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावसह राज्यातील राष्ट्रीय महामार्ग योजना संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत महत्त्वपूर्ण चर्चा केली. बेळगाव शहरातील रस्त्यांचे महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प, नूतन जिल्हाधिकारी कार्यालय संकुल, येथील क्रीडांगणे, राष्ट्रीय महामार्ग मजबुतीकरण आदीकडे थेट लक्ष देण्याची गरज मंत्री जारकिहोळी यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्त केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आवश्यक निधीची थेट तरतूद करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.

लीला पॅलेस मधील बैठकीचे औचित्य साधून जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा म्हैसूरी पगडी व शाल घालून स्मृतिचिन्ह देण्याद्वारे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री जातीहोळी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे बेंगलोर येथे हाती घेण्यात आलेल्या महामार्गांच्या विकास कामांच्या प्रगतीची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.