बेळगाव लाईव्ह :येत्या 31 डिसेंबर, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव अबकारी खात्याने मोठी कारवाई करताना गोव्याहून लॉरी मधील मशरूम बियाणाच्या पोत्यांच्या ढिगार्याखाली दडवून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेल्या 25 लाख रुपये किमतीच्या दारूसह एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक झाली असून शहरानजीकच्या काकती येथे आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपींची नावे कुतुबुद्दीन आणि रहमान साब अशी आहेत. अबकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने संशयावरून काकती जवळ आज सकाळी गोव्याहून आळंबी बियाणांची पोती घेऊन येणारी एक लॉरी अडवून तिची तपासणी केली. त्यावेळी आळंबी बियाणांच्या पोत्यांखाली दारूच्या बाटल्या भरलेले सुमारे 600 बॉक्स आढळून आले. त्याचप्रमाणे तपासणीमध्ये उंची दारूंच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावल्याचे थोडक्यात बाटल्यांमध्ये बनावट उंची दारू भरण्यात आल्याचे उघडकीस आले. तथापी त्या नावाच्या दारूची डिस्टलरी गोव्यात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सदर कारवाईत 25 लाख रुपयांची दारू आणि 30 लाख रुपये किमतीची लॉरी असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच लॉरी चालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
सदर कारवाई संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एका वरिष्ठ अबकारी अधिकारी वाय. मंजुनाथ यांनी सांगितले की, चोरटी दारू वाहतूक शोधण्यासाठी आम्ही पथक नेमले आहे. सदर पथकाने संशयावरून ही लॉरी अडवून तपासणी केली असता तिच्यात एकूण 600 बॉक्स दारूचा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या या दारूची किंमत 25 लाख रुपये असून वाहनाची किंमत 30 लाख रुपये आहे. या पद्धतीने एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे कुतुबुद्दीन आणि रहमान साब अशी आहेत. यापैकी एक जण यरगट्टी जवळील तर दुसरा बागलकोट येथील रहिवासी आहे. आतापर्यंत आम्ही 5 वेळा अशा पद्धतीने चोरट्या दारूचा मोठा साठा शोधून काढला असून त्याची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक होते.
आज जप्त केलेल्या दारूमध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की आहे. मात्र या नावाची डिस्टिलरी गोव्यात नाही. त्यामुळे ही बनावट दारू आहे. आता ही बनावट दारू तयार करणाऱ्याला अटक करण्यासाठी विशेष पथक स्थापण्यात आले आहे असे सांगून लाॅरी मधील मशरूम सीड्स अर्थात आळंबी बियाणाची माती असलेल्या पोत्यांच्या ढिगार्यामध्ये बेमालूमरित्या लपवून दारूची वाहतूक केली जात होती, अशी माहिती अबकारी अधिकारी मंजुनाथ यांनी दिली.