Friday, October 18, 2024

/

इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यास बेळगाव पात्र

 belgaum

बेळगाव लाईव्ह:पंतप्रधान -ईबस सेवा योजनेअंतर्गत बेळगावसह राज्यातील 11 शहरांनी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पात्रता पूर्ण केली असल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी विधान परिषदेला दिली आहे.

पंतप्रधान -ईबस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यास पात्र असलेल्या राज्यातील शहरांमध्ये म्हैसूर, मंगळूर, दावणगिरी, शिमोगा, तुमकुर, बेळगाव, हुबळी, धारवाड, कलबुर्गी, बळ्ळारी आणि विजयपुरा यांचा समावेश आहे. यासाठी केएसआरटीसीने म्हैसूर आणि मंगळूरसाठी प्रत्येकी 100 तसेच दावणगिरी, शिमोगा व तुमकुरसाठी प्रत्येकी 50 बसेस अशा एकूण 350 इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे.

एनडब्ल्यूकेआरटीसीने बेळगावसाठी 100 आणि हुबळी -धारवाडसाठी 110 अशा एकूण 210 बस गाड्यांची मागणी केली आहे.

दुसरीकडे केकेआरटीसीने कलबुर्गीसाठी 100, बळ्ळारी 55 आणि विजयपुरासाठी 80 अशा एकूण 235 इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे. या तीनही महामंडळांकडून बसेसच्या मागणी संदर्भात आलेल्या प्रस्तावांचे पुनरावलोकन केले जात असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

भारताची विद्युत गतिशीलता पायाभूत सुविधा वाढविणे हे पंतप्रधान -ईबस सेवा योजनेचे ध्येय असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत केंद्राच्या 20 हजार कोटी रुपये खर्चातून सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर देशभरातील 169 शहरांमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या जाणार आहेत. सदर योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या 20 कोटी रुपयांसह एकूण सुमारे 57,613 कोटी रुपये खर्च येणार आहे. गेल्या 2011 च्या जनगणनेनुसार ज्या शहरांची लोकसंख्या 3 लाख किंवा त्याहून अधिक आहे, अशा शहरांमध्ये 10 वर्षाच्या कालावधीसाठी इलेक्ट्रिक बसेस धावतील. या शहरांमध्ये केंद्रशासित प्रदेशातील सर्व राजधानीची शहरे, ईशान्येकडील प्रदेश आणि डोंगरी राज्यांचा समावेश असणार आहे. तसेच सध्या ज्या शहरांमध्ये नियोजनबद्ध बस सेवेचा अभाव आहे अशा शहरांना पंतप्रधान -ईबस सेवा योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे. एकंदर पंतप्रधान -ईबस सेवा योजने अंतर्गत इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सध्याच्या घडीला बेळगावसह 11 शहरांची निवड केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.