बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सातव्या दिवशी विधानसभेमध्ये उत्तर कर्नाटकातील मुद्द्यांवर चर्चेला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यांवर सर्वप्रथम विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी जवळपास दीड तास चर्चा केली.
सवलती देण्याच्या बाबतीत उत्तर कर्नाटकच्या तुलनेत दक्षिण कर्नाटकाला अधिक झुकते माप दिले जाते. येथील राजकीय नेत्यांनीही त्यासाठी आवश्यक प्रयत्न केलेले नाहीत. याबाबतीत दक्षिण कर्नाटकातील नेतेमंडळी अधिक प्रभावी ठरत असतात. यामुळेच उत्तर कर्नाटकातील जनतेवर सातत्याने अन्याय झाला आहे. या भागातील पर्यटन, कृषी, पाणीपुरवठा वगैरे सर्व क्षेत्रांचा विकास होणे गरजेचे आहे. उत्तर कर्नाटकातील नेते मंडळींनी संघटितपणे कधीच आवाज उठवला नाही त्यामुळे आता त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे यापुढील काळात मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे अथवा भागाचे असू देत त्यांनी समंजसपणे आमच्या भागाच्या विकासाकडे लक्ष द्यावे तरच आम्ही स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याच्या निर्मितीचा विचार करणार नाही.
महाराष्ट्राने पुणे, नागपूर वगैरे शहरे ज्याप्रमाणे विकसित केली. त्याप्रमाणे कर्नाटकने सुद्धा बेंगलोर आणि म्हैसूर वगळता अन्य शहरांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर हे देखील महाराष्ट्रातील होते. या महान व्यक्तींचा तुम्ही ‘या राज्यातले त्या राज्यातले’ म्हणून अवमान करता कामा नये. हे सर्वजण संपूर्ण देशाचे थोर नेते आहेत. कृष्णा नदीच्या पाण्याचा सर्वदूर उपयोग व्हावा यासाठी कालवे धरण यांची निर्मिती केली गेली पाहिजे. पाणी पुरवठा योजना व्यवस्थित राबविण्यासाठी सरकारने किमान 25 हजार कोटी रुपयांचे अनुदान देणे गरजेचे आहे, असे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी स्पष्ट केले.
सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये वर्षातून केवळ 10 दिवस करण्याऐवजी महिनाभर भरवला जावं. त्यासाठी महत्त्वाची सरकारी कार्यालयात या ठिकाणी स्थलांतरित केली जावीत. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाची एक बैठक बेंगलोरमध्ये तर दुसरी बेळगावमध्ये घेतली जावी, अशी मागणीही आमदार पाटील -यत्नाळ यांनी यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासाबाबत चर्चा करताना केली.