बेळगाव लाईव्ह :आधुनिक आलिशान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची बेंगलोर ते बेळगाव दरम्यान यशस्वी चांचणी झाल्यानंतर ही रेल्वे सेवा हिवाळ्यापर्यंत सुरू होईल असा अंदाज होता. मात्र तसे घडले नसले तरी पीटलाइन वरील ओएचई, पाणी भरण्याची सेवा यासारख्या देखभालीच्या आवश्यक मूलभूत सुविधा बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सध्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सकाळी बेंगलोर येथून सुटून अवघ्या 5-6 तासात धारवाडला पोहोचत आहे. त्याचप्रमाणे देखभालीच्या एक तासासह परतीच्या प्रवासात बेंगलोरला पोहोचण्यास तिला सुमारे 6 तासात लागत आहेत.
तथापि जर वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत विस्तारित केल्यास तिचा दिवसाचा एकूण प्रवास कालावधी 17 -18 तासापर्यंत वाढणार आहे.
यामुळे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेचा उद्देश सफल होणार नाही. या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कालावधी जास्त लागत असल्यामुळे सध्याच्या मार्गावर बेंगलोर ते बेळगाव दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करणे अवघड असल्याचे सांगितले.
याचा अर्थ त्याच कालावधीत वंदे भारत रेल्वे इतर अनेक ठिकाणी धावत असते. त्यामुळे बेळगावपर्यंत वंदे भारत रेल्वे धावण्यास कोण आणि कशासाठी प्रतिबंध करत आहे? हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, बेळगाव -बेंगलोर प्रवासाचा कालावधी अधिक असल्यामुळे रेल्वे बोर्डाने तूर्तास तरी बेळगावपर्यंतच्या वंदे भारत रेल्वेच्या विस्तारास हिरवा गंभीर दाखवलेला नाही. मात्र यापूर्वी रेल्वे बोर्डाच्या परवानगीनेच गेल्या नोव्हेंबर महिन्यात बेंगलोर बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची चांचणी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या बेंगलोर -धारवाड वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेचा बेळगावपर्यंत विस्तार केला जाणार होता. यासाठी नैऋत्य रेल्वेने सर्व तयारीही केली होती.
बेळगावमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात वंदे भारत सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र रेल्वे बोर्डाने बेंगलोर -बेळगाव वंदे भारताचा प्रस्ताव ना मंजूर केल्यामुळे ही शक्यता फोल ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रवासाचा कालावधी जास्त लागत असल्यामुळे बेळगाव पर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू करण्याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र त्याऐवजी बेळगाव -बेंगलोर मार्गावर इंटरसिटी एक्सप्रेस आणि बेळगाव -पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांनी मांडला आहे.
If vande bharat can run between pine belgaum it’s most welcome.