बेळगाव लाईव्ह :सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग आता त्यातील भ्रष्ठाचारामुळे अधिक अडचणींचा ठरत आहे. याला जबाबदार ठरत आहे तो सहकारातील स्वाहाकार. संचालकांकडून जमविली जाणारी माया आणि संस्थेला धोक्यात आणण्याची प्रवृत्ती यामुळे ठेवीदारांमध्ये हाहाकार माजवण्याचा परिस्थिती निर्माण करत आहे.
हे ठेवीदार कोण आहेत? गोरगरीब, मध्यमवर्गीय, कष्टकरी, शेतकरी आणि कामगार. मोलमजुरी करून जगणाऱ्या महिला. आपले भविष्य सुखकर होण्यासाठी कष्ठाची कमाई या सोसायट्यांमध्ये गुंतवून ते पुढील आयुष्याच्या समृद्धीकडे ते डोळे लावून बसतात. मात्र त्यांच्या कमाईवर सध्या काही लफंग्यांची चैन सुरु झाली आहे. हे नेमके का होत आहे? आडमार्गाने पैसे कमावण्याची संस्था चालकांची प्रवृत्ती याला कारणीभूत ठरत आहे.
काबाडकष्ट करून कमाविलेली संपत्ती सुरक्षित राहील आणि त्यात व्याजाची भर पडून पुढील जीवन सुखकर होईल अशी आस धरून बसलेल्या जीवांवर हा अन्याय ठरणार आहे. यासाठी आडमार्गाने धनधांडगे होणाऱ्या संचालकांना वेळीच शासन होणे गरजेचे बनले आहे. कष्ठ करणारे, घाम गाळणारे ठेवीदार देशोधडीला लागायचे नसतील तर त्यांच्या जीवावर आपला स्वार्थ साधणाऱ्यांवर चाप बसणे गरजेचे आहे. आज सगळ्याच वाटा उघड्या झाल्या आहेत. भ्रष्ट कारभार उघडकीला येऊ लागले आहेत. पुरावे सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होत आहेत. पैसे खाऊन साथ देणारे अधिकारी आणि त्यांच्या जीवावर आपले गैरधंदे लपवून ठेवणाऱ्यांचा प्रकार चव्हाट्यावर आणण्याची खरी वेळ आली आहे.
सध्या ठेवीदार संभ्रमात आहेत. त्यांना आपल्या ठेवी किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाला उत्तर मिळवून घेण्यासाठी ते संस्थांचे उंबरे झिजवू लागले आहेत. पूर्ण प्रकार चव्हाट्यावर आल्यास ठेवीदारांच्या लागणाऱ्या रांगा अशा संस्थाचालकांची भंबेरी उडविणार आहेत. विषय आहे तो सहकाराचा बळी जाईल याचा आणि प्रमुख विषय आहे तो अशा संस्थेचा शेवट होईल याचा.
आता संबंधित संस्थांमधील प्रामाणिक सदस्यांनी पुढे होऊन भ्रष्ठान्ना शासन केल्यास ठेवीदारांच्या बरोबर संस्थाही टिकेल आणि स्वाहाकाराला दंड बसेल. शिक्षा हाच एकमेव मार्ग लक्षात ठेऊन यासंदर्भातील काही कार्यकर्ते आता दिल्लीत बसलेल्या सहकाराच्या मुख्यालयालाच हादरा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. (क्र. म. श. )