बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील व्यापारी आस्थापनांच्या फलकांचे कानडीकरण करण्याचा फतवा महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी काढला आहे. फलकावर ६० टक्के भागात कन्नड मजकूर व बेळगावी असा उल्लेख करावा. अन्यथा व्यापार परवाना रद्द करून टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांच्या या फतव्याविरोधात शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतून फलक लावले आहेत. त्यावर कन्नडलाही स्थान दिले आहे. पण, काही दिवसांपासून कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आता आयुक्त दुडगुंटी व्यांनी पत्रक जाहिर केले आहे. कथित कार्यकर्त्यांना शहरातील व्यापारी जुमानत नसल्यामुळे प्रशासनाने कानडीकरणाचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार व्यापारी आस्थापनांवरील नामफलकात ६० टक्के कन्नड भाषेचा वापर करण्यात यावा. शहराचा उल्लेख बेळगाव किंवा बेलगाम असा न करता बेळगावी असा करण्यात यावा. अन्यथा व्यापार परवाना रद्द करण्यात येईल आणि आस्थापनाला टाळे ठोकण्यात येतील, असे त्यात म्हटले आहे.
बंगळुरात कन्नड रक्षण वेदिकेने कन्नड नामफलकांसाठी आंदोलन केले. त्यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही करण्यात आले. तशा प्रकारचे आंदोलन आणि व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न बेळगावातही झाला. पण, त्याला लोकांनी पाठिंबा दिला नाही. कन्नड कार्यकर्त्यांना काही व्यापाऱ्यांनी हाकलून लावले. त्यामुळे, आता प्रशासनाच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी भाषिकांवर दबाव घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कन्नडिगांचा मनपासमोर पुन्हा थयथयाट
कन्नड वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांना झालेल्या अटकेचा विरोध करत मूठभर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात आंदोलन करत शहराला भेटीत जाण्याचा प्रयत्न केला.
शहरातील फलकांचे कानडीकरण करण्यात यावे. महापालिका सभागृहात मराठी आणि हिंदीमध्ये बोलण्यास देऊ नये, यासाठी कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी शनिवारी पुन्हा महापालिकेसमोर जाऊन थयथयाट केला. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना काल निवेदन दिले होते.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मराठी आणि हिंदीमध्ये बोलल्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
परिणामी पोलिसांनी महापालिकेसमोर बंदोबस्त
वाढवला होता. कन्नड संघटनांच्या या थयथयाटामुळे अखेर महापालिका आयुक्त
अशोक दुडगुंटी यांनी शहरातील फलकांवर ६०
टक्के कानडीकरणाची सक्ती आणि बेळगावचे
बेळगावी लिहिण्याचा फतवा काढला आहे.
त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करा
महापालिका सभागृहात त्रिभाषा धोरण राबविण्यावर एकमुखी ठराव संमत झाला आहे. आतापर्यंत कन्नडसह मराठी आणि इंग्रजीतून महापालिकेतील कागदपत्रे देण्यात येत होती. पण, आता भाजपच्या कार्यकाळात त्यात खंड पडला आहे. त्यामुळे, कानडीकरणाचा आग्रह धरणाऱ्या आयुक्तांनी आधी त्रिभाषा धोरणाचा अवलंब करावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.