बेळगाव लाईव्ह:दरवर्षी पावसाळ्यात शेत पिकांचे नुकसान करणाऱ्या बळ्ळारी नाल्यासह लेंडी नाल्यांची साफसफाई करून या नाल्यांमुळे शेत पिकांचे नुकसान झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना बेळगाव महापालिकेच्या सहाय्यक कार्यकारी अभियंतांनी बेळगाव तहसीलदारांना केली आहे.
मागील 10-15 वर्षापासून लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे आसपासच्या शेत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या नाल्यांची साफसफाई आणि रुंदीकरण झाले नसल्यामुळे हे नुकसान होत आहे.
ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच नाल्यांची सफाई व रुंदीकरण होणार नसेल तर संबंधित शेतकऱ्यांना प्रति एकर 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेळगावच्या शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महापालिका वगैरे संबंधित सर्वांकडे केली होती.
लेंडी व बळ्ळारी नाल्याची साफसफाई आणि दुरुस्तीचे अधिकार महापालिकेला देण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत कृषी मंत्र्यांनी महापालिकेला आवश्यक कार्यवाहीचा आदेश दिला आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी करताना आता बेळगाव महापालिकेच्या सहाय्यक कार्यकारी अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना बळ्ळारी नाल्यासह लेंडी नाल्यांची साफसफाई करून या नाल्यांमुळे शेत पिकांचे नुकसान झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे स्वच्छता आणि दुरुस्तीच्या बाबतीत संबंधित दोन्ही नाल्यांसह शेतकऱ्यांचे भाग्य लवकरच उजळणार आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना शेतकरी नेते नारायण सावंत म्हणाले की, बेळगाव येथील येळ्ळूर रोडपासून मुचंडीपर्यंतच्या बळ्ळारी नाल्यामुळे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन त्यांना त्रास होत आहे. मी गेली 10 वर्षे बळ्ळारी आणि लेंडी नाल्याच्या सफाई आणि रुंदीकरणासाठी पाठपुरावा करत आहे.
त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मागणीला पुष्टी मिळावी म्हणून 4 वर्षांपूर्वी मी बळ्ळारी नाल्यामुळे शेत पिकांचे कशा पद्धतीने नुकसान होते आणि बळ्ळारी नाला कसा तुंबतो? याचे ड्रोन कॅमेराद्वारे सर्वेक्षण करून घेतले होते असे सांगून त्या सर्वेक्षणाची छायाचित्रे निवेदना सोबत जोडल्यामुळे आता कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याला शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाकारणे अशक्य झाले आहे.
त्यानुसार कृषिमंत्र्यांना देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे त्यांनी बळ्ळारी आणि लेंडी नाला स्वच्छता तसेच त्याच्या आवश्यक दुरुस्तीचे आदेश दिले असल्याचे सावंत यांनी सांगितले.