बेळगाव लाईव्ह:बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 14 ते 15 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या निवास व्यवस्थेसंदर्भातील बिले सर्व हॉटेल्सकडून संकलित करण्यात आली असून अधिवेशनाच्या निवास व्यवस्थेचा एकूण खर्च तब्बल सुमारे 6 कोटी 50 लाख रुपये आला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या निवास व्यवस्थित झालेला खर्चाचा तपशील महापालिकेकडून तयार केला जात आहे. यावेळी शहर व परिसरातील 79 हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था करण्यात आली होती.
त्यासाठी या हॉटेल्स मधील 2213 खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार या खोल्यांचे भाडे जवळपास 6.5 कोटीपर्यंत गेले आहे. महापालिकेने सर्व बिले संकलित केली असून पुढील आठवड्यात एकूण बिलं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवले जाईल.
दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निवास व्यवस्थेचा खर्च सुमारे 80 लाख रुपयांनी जास्त आला आहे. गतवर्षी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते आणि त्या वेळचे विधिमंडळ अधिवेशन 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आले होते. मात्र दोन दिवस आधीच अधिवेशनाचे काम गुंडाळण्यात आले होते.
थोडक्यात 28 डिसेंबर रोजी अधिवेशन समाप्त झाल्यामुळे केवळ 10 दिवसांच्या निवास व्यवस्थेचे बिल शासनाकडून हॉटेल मालकांना देण्यात आले होते. मात्र यंदा 4 ते 15 डिसेंबर या काळात अधिवेशन झाले. शिवाय अधिवेशन 15 डिसेंबरपर्यंत चालल्यामुळे यंदा 12 दिवसांच्या निवास व्यवस्थेचे बिल शासनाकडून दिले जाणार आहे.
त्यामुळेच यंदाचा निवास व्यवस्थेचा खर्च वाढला आहे. याखेरीज गतवर्षीच्या तुलनेत आरक्षित केलेली हॉटेल्स व खोल्यांची संख्याही जास्त होती.